मुंबई : राज्यात शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर शिवसेनेने मुख्यमंत्रिपद घेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केले. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले पण ३ पक्ष एकत्र म्हणजे अंतर्गत धूसपूस तर होणारच. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केला आणि महाविकास आघाडीला सत्तेतून बाहेर पडावं लागलं. राज्याच्या राजकारणाची नवी समीकरणं तयार झाली.
एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत मुख्यमंत्रिपदाची धुरा हाती घेतली. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाले. शिवसेनेतील बंडखोर आमदारांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मातोश्रीवर बोलवतील अशी अपेक्षा आहे. उद्धव ठाकरेंनी अद्याप कोणाला बोलवणे धाडले नसल्याचे बंडखोरांचे म्हणणे आहे. शिवसेनेचे दीपक केसरकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरेंना बजावलं आहे.
मुलगी पळून जाऊन लग्न केल्यानंतर त्यांना परत आणताना त्यांच्या कुटुंब प्रमुखाची ही परवानगी घ्यावी लागते. त्यांच्याशी चर्चा करावी लागते. आता भाजप आणि शिंदे गटाची युती झालेली आहे. सरकार स्थापन झालेलं आहे. त्यामुळे आम्हाला परत बोलवायचे असेल तर उद्धव ठाकरेंना भाजपसोबत चर्चा करावी लागेल. फक्त आमच्याशी चर्चा करुन चालणार नाही, असे दीपक केसरकरांनी उद्धव ठाकरेंना बजावले आहे.