Ahmednagar News : आगामी लोकसभेच्या अनुशंघाने महायुती अर्थात भाजप, अजित पवार गट, शिंदे गट आदींसह घटकपक्ष कामाला लागले आहेत. या अनुशंघाने महायुती मेळावा घेत आहे. अहमदनगर जिल्ह्यात पहिलाच मेळावा काल रविवारी नगरमध्ये पार पडला. यामध्ये महायुतीमधील सर्वच घटक एकत्रित आले.
यावेळी खासदार डॉ. सुजय विखे, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार मोनिका राजळे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार संग्राम जगताप आदींसह घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. परंतु या मेळाव्यात महायुतीमधील खदखद जाणवली. यामध्ये आ.राम शिंदे यांनी विखेंना अप्रत्यक्ष टोलेबाजी केली तर कर्डिलेंनाही विधानसभेची धाकधूक आहे असे जाणवले. तर अजित दादांचे अहमदनगरमधील तीन आमदार मेळाव्यास आलेच नाहीत.
काय म्हणाले माजी आ. शिवाजी कर्डीले ?
ज्यांना लोकसभा लढवायची आहे, त्यांना सगळ्यांची गरज असते. आता वर सगळे एकत्र झालेत. लोकसभा एकत्र लढणार आहेत. परंतु विधानसभेचे काय होतेय, हे आम्हाला माहिती नाही. त्यामुळे लोकसभेबरोबर विधानसभा व्हावी, म्हणजे आम्ही सुखरुप राहू अशी मागणी करत विधानसभेत मागील निकालाची पुनरावृत्ती घडण्याची अप्रत्यक्ष भीती जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी व्यक्त केली.
आमची निवडणूक लोकसभ बरोबर सोपी होईल. त्यामुळे वरिष्ठांकडे एकत्र निवडणुका घेण्याची मागणी करावी, असे कर्डिले म्हणाले. लोकसभा व विधानसभेनंतर झेडपी, पालिकांच्या निवडणुकीचे काय, याबाबत कार्यकत्यांच्या मनात शंका असल्याचेही ते म्हणाले.
आ. राम शिंदे यांची टोलेबाजी
आमदार राम शिंदे यांनी आपली लोकसभेची इच्छा अनेकदा बोलून दाखवली आहे. महायुतीच्या मेळाव्यातही आमदार राम शिंदे यांनी मध्यप्रदेश, राजस्थानची उदाहरणे देत आता पक्षात शिफारशी, लॉबिंग असे प्रकार चालणार नाहीत, कधीही काहीही घडू शकते, लोकसभेची उमेदवारी कोणाला मिळेल हे सांगता येत नाही, असे म्हणत विखे पितापुत्रांना सूचक इशारा दिला.
लंकेंसह अजितदादांच्या तीन आमदारांची पाठ
महायुतीच्या मेळाव्यास सर्वच घटक येतील असे वाटत असताना मात्र राष्ट्रवादीच्या तीन आमदारांनी पाठ फिरवली. आमदार आशुतोष काळे, आमदार नीलेश लंके, आमदार डॉ. किरण लहामटे हे मेळाव्याला आले नाहीत. हे तीनही आमदार न आल्याने चर्चांना उधाण आले होते.
आठवलेंच्या उमेदवारीची मागणी अन मंत्री विखे यांचा रोखण्याचा प्रयत्न
महायुतीच्या मेळाव्यात खा. सदाशिव लोखंडे यांच्या समोरच आरपीआयचे नेते सुनील साळवे यांनी शिर्डी लोकसभा मतदार संघातून मंत्री रामदास आठवले यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी केली. पालकमंत्री विखे यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला परंतु ही कार्यकत्यांची भावना असल्याचे त्यांनी सांगत आपला मुद्दा कडेला नेला.
पालकमंत्री विखे यांचे इंडिया आघाडीवर टीकास्त्र
महायुतीच्या मेळाव्यात पालकमंत्री विखे यांनी इंडिया आघाडीवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, विरोधकांनी कितीही वल्गना केल्या, आघाड्या केल्या तरी काहीच फरक पडणार नाही. इंडिया आघाडीच्या बैठका केवळ पर्यटन करण्यासाठी होत आहेत. या आघाडीमध्ये बाद झालेले लोक असून त्यांना पक्ष आणि आमदार सांभाळता आले नाहीत असे नेते एकत्र आले आहेत अशी टीका त्यांनी केली.