राजकारण

Ahmednagar Politics : ‘एमआयडीसीसाठी एकाच जागेचा आग्रह संशयास्पद’,आ.रोहित पवार यांच्यावर भाजप पदाधिकऱ्याचा घणाघात

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील नगर व कोपरगाव तालुक्यातील एमआयडीसीचा तिढा सुटला आहे. तो प्रश्न मार्गी लागला. परंतु कर्जत एमआयडीसीचा तिढा मात्र सुटेना. या एमआयडीसीसाठी आ. रोहित पवार यांनी पाहिलेली जमीन महायुती सरकारने फेटाळून लावली.

त्यामुळे आता एमआयडीसी साठी नव्या जागेचा शोध सुरु झाला आहे. आतापर्यंत एमआयडीसीसाठी ६ जागा सूचवण्यात आल्या होत्या. त्यातील निवडक ठिकाणांची औद्योगिक विकास महामंडळाच्या पथकाने दुसऱ्यांदा पाहणी केलेली आहे.

‘एकाच जागेचा आग्रह संशयास्पद’

आ. रोहित पवार हे त्यांनी सुचवलेल्या जागेसाठी आग्रही आहेत. आता यावर भाजप भाजपचे तालुकाध्यक्ष शेखर खरमरे यांनी टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले आहेत की, कर्जत-जामखेडच्या लोकप्रतिनिधींनी विनाकारण बेरोजगार युवकांच्या नावाने कांगावा करणे योग्य नाही.

अधिकारी फोटोसेशन करीत असल्याचा त्यांचा आरोप हास्यास्पद असून यातून त्यांची उद्विग्नता दिसून येते असे त्यांनी म्हटले आहे. एमआयडीसीसाठी एकाच जागेचा आग्रह धरणे हे संशयास्पद असल्याचा घाणाघातही त्यांनी केला.

एखादा प्रश्न सोडवण्यासाठी खूप कांगावा केला, म्हणजे त्या प्रश्नाचा खूप अभ्यास आहे असे होत नाही, अशी टीका त्यांनी आ. पवार यांच्यावर केली.

 ‘या’ जागांची पुन्हा पाहणी

कोंभळी, रवळगाव, थेरगाव, पठारवाडी (भैरोबावाडी), बारडगाव सुद्रिक, अळसुंदे

नेमके काय आहे प्रकरण

कर्जत एमआयडीसी साठी आ. रोहित पवार आग्रही होते. एमआयडीसी मंजुरी आता अंतिम टप्प्यात होती. परंतु यात आ. राम शिंदे यांची एंट्री झाली. त्यानंतर महायुतीमध्ये अनेक सूत्र हलले. त्यानंतर कर्जत तालुक्यातील पाटेगाव येथील जागेचा प्रस्ताव औद्योगिक विकास महामंडळाने नाकारला व १५ दिवसांत नव्याने जागेचे प्रस्ताव शासनाला सादर करा असे सांगितले.

यावर आ. रोहित पवार यांनी टीकाही केली. त्याला राजकीय प्रतिउत्तरही आ. राम शिंदे यांनी दिले. आता नुकतीच आमदार प्रा. राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक होत नागरिकांनाच योग्य जागा सुचवण्याचे आवाहन आ. शिंदे यांनी केले होते.

त्यानुसार काही जागांची निवड करण्यात आली होती व औद्योगिक विकास महामंडळाच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने काही दिवसांपूर्वी त्या जागांची प्राथमिक पाहणी केली होती. आता पुन्हा एकदा एमआयडीसी अधिकाऱ्यांनी ६ निवडक जागांची पुन्हा पाहणी केली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts