Ahmednagar Politics : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नगर शहरात काल (७ मे) सभा पार पडली. या सभेमध्ये पहिल्याच रांगेत बसलेल्या ‘आप’च्या पदाधिकाऱ्याने ‘जेल का जबाब वोट से देंगे’ असा मजकूर लिहिलेले पोस्टर झळकवले.
हा आपचा पदाधीकारी पहिल्या रांगेत असल्याने व्यासपीठावरील उपस्थितांचे तत्काळ लक्ष त्याच्याकडे गेले. काही गोंधळ होण्याआधीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
अधिक माहिती अशी :
‘आप’चे जिल्हाध्यक्ष राजू आघाव व त्यांचे साथीदार शहराध्यक्ष मेजर भरत खकाळ हे सभेच्या पुढच्या बाजूला बसले होते. मोदी यांचे भाषण सुरू असताना आघाव यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा जेलमधील फोटो झळकविला. त्याखाली ‘जेल का जवाब वोट से देंगे’ असे लिहिले होते.सुरुवातीला त्यांच्याकडे कुणाचे लक्ष गेले नाही. त्यांनी ‘तानाशाही का जवाब हम लोकशाही से देंगे’ अशा घोषणा दिल्याने त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष गेले. त्यामुळे काहीसा गोंधळ उडाला. दरम्यान, जवळच असलेल्या पोलिसांनी तत्काळ आघाव यांना ताब्यात घेऊन तोफखाना पोलिस ठाण्यात ऊन तोफखाना पोलिस प्रतिबंधात्मक कारवाई करून आघाव व त्यांच्या साथीदारांना सोडून दिले.
‘या’ नेत्यांच्या अनुपस्थितीची चर्चा
अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे, भाजपाच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे, चंद्रशेखर घुले व नरेंद्र घुले पाटील, व नुकताच विखे यांना पाठिंबा दिलेले पारनेरचे माजी आमदार विजय औटी हे सभेला अनुपस्थित होते. या नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे एकच चर्चा रंगली होती.
लष्काराच्या हद्दीत हेलिपॅड
पंतप्रधानांच्या सभेसाठी लष्काराच्या हद्दीत हेलिपॅड तयार करण्यात आले होते. मोदी दुपारी पावणेचार वाजता सावेडी परिसरातील सभास्थळी आले होते. दरम्यान सभेच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीमध्ये प्रशासनाने बदल करुन अनेक रस्ते अडविल्याने सभेला येणाऱ्या नागरिकांची तसेच नगर शहरवासियांचीही गैरसोय झाल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान सभेला येणाऱ्यांना उत्साह दिसत होता. नागरिकांना मनमाड रस्त्यावर वाहने उभी करुन दोन-तीन किलोमीटर पायी चालत सभास्थानी यावे लागले तरी ते उत्साही दिसत होते. सभेला येणारे अनेक नागरिक बसेस, आरामगाड्या, खासगी वाहनांतून आल्याचे पाहायला मिळाले.