Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंत पाटील यांनी आपला राजकीय वारसदार निवडला आहे. लोकनेते राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी एकच जल्लोष करण्यात आला.
काही दिवसांपूर्वीच प्रतीक यांची कारखान्याच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली होती. या निवडीने जयंत पाटील यांचा राजकीय वारसदार हे प्रतीक हेच असणार हे निश्चित झाले होते. आता यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
जयंत पाटील यांनी दहा वर्षे कारखान्याचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यामुळे वडिलांनंतर मुलगाही कारखान्याचा कारभार बघणार आहे. प्रतीक यांचे आजोबा राजारामबापू पाटील यांनी १९६८ मध्ये हा कारखाना सुरू केला. तेव्हापासून कारखाण्यावर पाटील घराणे लक्ष घालत आहे.
दरम्यान, जयंत पाटील यांची राजकीय परंपरा प्रतीकच चालवणार हे या निवडीमुळे सिद्ध झाले आहे. संचालक कार्तिक पाटील बोरगाव यांनी अध्यक्षपदासाठी प्रतीक पाटील यांचे नांव सुचविले. आता जयंत पाटील हे आमदारकीचा देखील त्यांनाच पुढे करणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तसेच या कारखान्याच्या उपाध्यक्षपदाची धुरा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा विद्यमान उपाध्यक्ष विजयराव बळवंत पाटील यांच्याकडे कायम ठेवण्यात आली आहे. निवडीनंतर युवा कार्यकर्त्यांनी तुतारी, हालगी-घुमके आणि डीजेचा ठेका, फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करीत जोरदार आनंदोत्सव साजरा केला.