Jitendra Awad : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत एक वक्तव्य केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड अडचणीत आले आहेत. यामुळे भाजपने त्यांना राज्यात फिरू न देण्याचा इशारा दिला आहे. औरंगजेब आणि शायिस्तेखान होते, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज होते, असे वक्तव्य त्यांनी केले होते.
यामुळे आता भाजपा आक्रमक झाली असून भाजपा युवा मोर्चाने जितेंद्र आव्हाड यांना इशारा दिला आहे. भाजपा सरचिटणीस विक्रांत पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज उभ्या महाराष्ट्राची अस्मिता आहेत आणि जितेंद्र आव्हाड सारखी औरंगजेब आणि शायिस्तेखानाची पिलावळ जर महाराजांचा सातत्याने अपमान करत आहेत आणि हा अपमान भाजपा हे खपवून घेणार नाही.
तसेच ते म्हणाले, जितेंद्र आव्हाड हे जाणीवपूर्वक वारंवार ठरवून करीत आहेत. औरंगजेब आणि शायिस्तेखान यांच्याविषयी आव्हाडांच्या मनात आदराची भावना का आहे? कोणते नाते संबंध आहेत का? असेही ते म्हणाले.
तसेच जितेंद्र आव्हाड यांनी याप्रकरणी माफी मागावी अन्यथा युवा मोर्चा राज्यभर औरंगजेब धार्जिण्या आव्हाड यांचे पुतळे जाळून निषेध आंदोलन करेल. तसेच आव्हाडांनी जर अशी वक्तव्य त्वरित थांबवली नाहीत तर औरंगजेबाच्या या पिलावळीला महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असेही ते म्हणाले.
जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीचा दाखवायचा चेहरा एक आणि करायचा चेहरा एक हे महाराष्ट्राला कळून चुकले आहे, असेही ते म्हणाले. यामुळे येणाऱ्या काळात यावरून वातावरण तापण्याची शक्यता आहे.