राजकारण

कॉपी करण्यासाठी माजी मंत्र्याने सल्लागार नेमलाय, आमदार रोहित पवारांचा राम शिंदे यांना टोमणा

Karjat Jamkhed : येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुका 15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान होतील आणि 20 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे शनिवारी निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाचे एक 14 सदस्यांचे पथक नुकतेच महाराष्ट्रात दाखल झाले आहे. हे पथक राज्यातील निवडणुकीसाठीच्या तयारीचा आढावा घेणार आहे. यानंतर मग निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. आज आणि उद्या हे पथक महाराष्ट्रातील निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार असे समजत आहे.

तत्पूर्वी मात्र महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या माध्यमातून जोरदार तयारी सुरू आहे. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात देखील आजी-माजी आमदारांच्या माध्यमातून तयारी सुरू करण्यात आली आहे.

या जागेसाठी महायुतीकडून पुन्हा एकदा माजी मंत्री राम शिंदे यांना तिकीट दिले जाऊ शकते आणि महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार रोहित पवार यांना तिकीट मिळणार असे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर या दोन्ही उभय नेत्यांच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत.

दरम्यान आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत काल अर्थातच गुरुवारी कर्जत आगाराचे लोकार्पण झाले. कर्जत आगाराचे लोकार्पण माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते करण्यात आले. या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने बोलताना रोहित पवार यांनी माजी मंत्री तथा माजी विधानसभा आमदार राम शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

2017 मध्ये तत्कालीन कॅबिनेट मंत्री अन कर्जत जामखेडचे तत्कालीन लोकप्रतिनिधी कर्जत आगाराचे पत्र तयार आहे असे म्हणाले होते. मात्र त्यांनी फक्त वेळ काढूपणा केला. त्यांना कर्जत आगाराचे काम करता आले नाही. कारण की काम करायला धमक लागते आणि ती धमक त्यांच्यात नव्हती, अशी टीका रोहित पवार यांनी केली.

तसेच पुढे बोलताना पवार यांनी आपल्या सारखी वेशभूषा आणि कार्यक्रम इव्हेंट कॉपी करण्यासाठी त्यांनी २० लाख रुपये देत एक कन्सल्टंट म्हणजे सल्लागार नेमला आहे असं म्हणतं राम शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर घनाघात केला आहे.

यावेळी रोहित पवार यांनी येथील माजीमंत्री असणाऱ्या लोकप्रतिनिधीनी कर्जत पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या लोकार्पणप्रसंगी पोलीस चौकीची मागणी केली असता तुम्ही क्राईम रेट वाढवा तेव्हा ते मंजूर होते असे म्हटले होते, असे म्हणतं शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले.

तसेच त्यांनी आपण येथे सर्वसामान्य जनतेसाठी दोन पोलीस ठाणे अन प्रशिक्षण केंद्र आणले असल्याचे सांगितले. मागील काळात कर्जत बसस्थानक श्रीगोंदा, जामखेड, करमाळा, बारामती आणि नगरवर अवलंबून राहत होते. मात्र, ती परिस्थिती आपण निश्चित बदलू. माझी ओळख ही कर्जत-जामखेडच्या जनतेमुळे झाली हे मी कदापी विसरणार नाही असेही पवार यांनी यावेळी म्हटले आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts