Karjat Jamkhed News : महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. निवडणुकांचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. यामुळे राज्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघांमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मात्र कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाची बातच न्यारी आहे. कर्जत जामखेड हा राज्यातील सर्वाधिक चर्चेचा विधानसभा मतदारसंघ. यास कारण असे की येथून शरद पवार यांचे नातू निवडणुकीच्या रिंगणात उतरतात.
गेल्या निवडणुकीत बारामती मधून येऊन रोहित पवार यांनी येथील भूमिपुत्र राम शिंदे यांचा पराभव केला होता. 2019 प्रमाणेच यावेळी सुद्धा रोहित पवार विरुद्ध राम शिंदे अशी लढत होणार आहे. यामुळे या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. भारतीय जनता पक्षाने नुकत्याच दोन दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत रामाभाऊंना स्थान मिळाले आहे.
रामाभाऊ हे भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते, कर्जत जामखेडचे भूमिपुत्र तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय नेते. त्यांनी तीनदा कर्जत जामखेडचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीत त्यांच्या विजयाची शक्यता अधिक होती.
परंतु गत निवडणुकीत त्यांना अंतर्गत गटबाजी सहित वेगवेगळ्या कारणांमुळे पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे यंदा कर्जत जामखेड मध्ये काय होणार? कोण होणार या मतदारसंघाचा आमदार हा मोठा प्रश्न आहे. या ठिकाणी मैदान तेच, उमेदवारही तेच असा सामना होईल.
गेल्या निवडणुकीत रामा भाऊंचा पराभव झाला असला तरी देखील त्यांना विधान परिषदेची आमदारकी मिळाली. फडणवीस यांचे निकटवर्ती असल्याने त्यांचे विधानपरिषदेवर पुनर्वसन करण्यात आले, तसेच आता त्यांना उमेदवारांच्या पहिल्याच यादीत स्थान मिळाले आहे, यावरून पक्षाचा रामाभाऊंवर तगडा विश्वास आहे हे अधोरेखित होते.
कर्जत जामखेडची यंदाची निवडणूक वेगवेगळ्या मुद्द्यांवर लढवली जाणार आहे. भूमिपुत्र विरुद्ध बाहेरचा उमेदवार हा देखील या निवडणुकीचा एक मुद्दाचं ठरणार आहे. कर्जत जामखेड मधील बहुतांशी शेतकरी कोरडवाहू शेती करतात. यामुळे येथे उद्योगधंद्यांचा मुद्दा हा नेहमीच प्रमुख राहिला आहे.
या निवडणुकीतही एमआयडीसीचा मुद्दा प्रमुख ठरणार आहे. येथे जातीय समीकरणे देखील महत्त्वाची ठरतात. यामुळे यंदाच्या निवडणुकीत येथून कोणाला संधी मिळणार जनतेचा कौल काय राहणार हे पाहण्यासारखे ठरेल. तथापि माजी आमदार राम शिंदे यांनी आपण 100% विजयी होणार असे प्रतिपादन केले आहे.
रामाभाऊ 2009 आणि 2014 मध्ये येथून विधानसभेवर गेले होते. 2019 मध्ये विजयी झाले असते तर रामा भाऊंची हॅट्रिक झाली असती. मात्र 2019 ची ही संधी त्यांना 2024 मध्ये पुन्हा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे या संधीचे सोने करण्यासाठी शिंदे यांनी कंबर कसली आहे. त्यांना बीजेपीच्या पक्षश्रेष्ठींचा देखील फुल सपोर्ट आहे.
सोबतच बारामती लोकसभा मतदारसंघात मिळालेला पराभवाचा वचपा काढण्यासाठी स्वतः अजितदादा देखील या मतदारसंघात रामाभाऊंना रसद पुरवणार आहेत. भाजपचे सरकार आल्यापासून कर्जत-जामखेड तालुक्याला मोठा निधी मिळालाय. 2019 आधी आमदार असताना आणि मंत्री असताना मोठ्या प्रमाणात कर्जत-जामखेड तालुक्यात निधी आल्यामुळेच कर्जत जामखेड तालुक्याच्या विकासाचे स्वप्न आता मतदारसंघातील लोक पाहू लागले आहेत आणि त्या निधीवरच मोठा विकास झालेला आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा कर्जत जामखेडची जनता मला निवडून देईल आणि परकीय अतिक्रमण आपल्याला चालणार नाही. मतदार संघाला आता खर्या अर्थाने भूमिपुत्राची गरज आहे असे राम शिंदे म्हणत आहेत. या मतदारसंघात यंदा दुरंगीच लढत होईल अशी शक्यता आहे.
राम शिंदे यांच्या विरोधात विद्यमान आ. रोहित पवार हेच दंड थोपटताना दिसणार आहेत. परंतु महाविकास आघाडी कडून काँग्रेस देखील या जागेसाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. यामुळे महाविकास आघाडीमध्ये या ठिकाणी बंडाळी होईल का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
एवढेच काय तर गेल्या काही दिवसांमध्ये रोहित पवार यांचे अनेक निकटवर्तीय कार्यकर्ते आणि पदाधिकारी देवेंद्र फडणवीस यांच्या गळाला लागले आहेत. यामुळे रोहित पवारांची मतदार संघातील राजकीय ताकद काही अंशी कमी झाली आहे. कार्यकर्ते त्यांच्यापासून दुरावत आहेत. यामुळे याचा फायदा माजी आमदार राम शिंदे यांना होऊ शकतो.