Karjat Jamkhed News : विधानसभा निवडणुकांचा नुकताच बिगुल वाजलाय. निवडणूक आयोगाने दोन दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यात. दरम्यान आज भारतीय जनता पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकांसाठी आपल्या अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीये.
भाजपाने आपल्या पहिल्या यादीत 99 उमेदवारांना संधी दिली आहे. अहिल्यानगर जिल्ह्या बाबत बोलायचं झालं तर जिल्ह्यातील पाच उमेदवारांची नावे पहिल्या यादीत झळकत आहेत. राहुरी, कर्जत जामखेड, शिर्डी, शेवगाव, श्रीगोंदा या जागांवर भाजपाने आपला भिडू उतरवलाय.
शिर्डीमधून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राहुरीत माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे, शेवगाव विधानसभा मतदारसंघात मोनिका राजळे अन श्रीगोंदामध्ये श्रीमती प्रतिभा पाचपुते यांना तिकीट देण्यात आले आहे. खरे तर, उमेदवारांची नावे ठरवण्यात राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वरचष्मा राहिला आहे.
पहिल्या यादीत फडणवीस यांच्या मर्जीतील अनेक नावे आपल्याला पाहायला मिळत आहेत. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघांमध्ये देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय राम शिंदे यांना उमेदवारी बहाल करण्यात आली आहे. अर्थातच यावेळी देखील कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार विरुद्ध राम शिंदे अशी लढत होणार आहे.
तिथं मैदान तेच, उमेदवारही तेच अशीच लढत होईल. त्यामुळं यावेळी कोण बाजी मारणार ? याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत बारामतीमधून येऊन रोहित पवारांनी राम शिंदे यांचा पराभव केला होता. खरेतर, हा मतदारसंघ 2019 च्या आधी भाजपाचा बालेकिल्ला समजला जाई.
येथे सलग 25 वर्षे भाजपाची सत्ता. त्यातील पंधरा वर्ष तर या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व रामाभाऊंनीच केले आहे. सलग तीन निवडणूका जिंकून रामाभाऊंनी मतदारसंघात आपली एक मोठी फळी डेव्हलप केली आहे. कार्यकर्त्यांच्या गळ्यातील ताईत म्हणून त्यांची ओळख आहे. ते देवेंद्र फडणवीस यांचे खूपच विश्वासू नेते आहेत यामुळे त्यांना मंत्रीपद सुद्धा मिळाले होते.
शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांचे खूपच जवळचे नेते आणि कर्जत जामखेड हा भाजपासाठी एक महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून पराभूत राम शिंदे यांना विधान परिषदेतून आमदारकी देण्यात आली. दरम्यान, आता त्यांना विधानसभेसाठी पुन्हा उमेदवारी बहाल करण्यात आली आहे.
यंदाच्या निवडणुकीत राम शिंदे हे मागील पराभवाचा वचपा करण्यासाठी सज्ज आहेत. त्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. कर्जत जामखेड मध्ये राम शिंदे यांची ताकद देखील वाढली आहे. गत काही दिवसांमध्ये शरद पवार गटातील काही नेते आणि पदाधिकारी भाजपा मध्ये आले आहेत.
यामुळे, शिंदे यांची यावेळी ताकत वाढली आहे. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून यावेळी बारामतीचे पार्सल बारामतीला पाठवा असे म्हणतं निवडणुकीसाठी रणसिंग फुंकण्यात आले आहेत. भाजपाने येथून पुन्हा एकदा भूमिपुत्राला संधी दिली आहे. यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेड मधून कोण विजयी होणार ? भूमिपुत्र राम शिंदे की रोहित पवार कोण वरचढ ठरणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे.