Karjat Jamkhed Vidhansabha Nivdnuk : नुकत्याच काही दिवसांपूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या आहेत. येत्या काही दिवसांनी आता महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलेले आहे. नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात देखील अशीच परिस्थिती आहे.
येथील महाविकास आघाडी आणि महायुती मधील इच्छुक उमेदवारांच्या माध्यमातून आतापासूनच तयारी सुरू करण्यात आली आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रोहित पवार हे येथील विद्यमान आमदार आहेत. गेल्या वेळी त्यांनी भारतीय जनता पक्षाचे राम शिंदे यांचा पराभव केला होता. यावेळी देखील कर्जत जामखेड मतदारसंघातून रोहित पवार विरुद्ध राम शिंदे असा सामना पाहायला मिळणार आहे.
यासाठी दोन्ही उभय नेत्यांच्या माध्यमातून आत्तापासूनच मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. राम शिंदे हे जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून आणि रोहित पवार यांच्या पक्षाने शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून तयारी सुरू केली आहे. अशातच कर्जत जामखेड मध्ये एका निनावी बॅनरची चर्चा रंगली आहे.
खरंतर, जामखेड शहरात नेहमीच बॅनर बाजी पाहायला मिळते. कित्येकदा शहरात लागलेल्या या बॅनरवरून राडे झालेत. अनेकदा वादविवादाच्या घटना अन संघर्ष मारामारीपर्यंत पोहचल्या आहेत. दरम्यान नुकत्याच काही दिवसांपूर्वी जामखेड नगरपरिषद जवळ ‘हम साथ साथ हैं हम पाच पाच है’ अशा आशयाचे बॅनर लागले.
हे बॅनर कोणी लावले या संदर्भात कोणतीच माहिती हाती आलेली नाही. मात्र या बॅनरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा गट), शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, काँग्रेस आणि भाजपा या पाच पक्षांचे चिन्ह पाहायला मिळालेत.
अर्थातच यामध्ये महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांचे चिन्ह आणि महाविकास आघाडीचे काँग्रेस आणि ठाकरे गटाचे मशाल हे चिन्ह पाहायला मिळत आहे. यासोबतच ‘हम साथ साथ है हम पाच पाच है’ असा उल्लेख देखील यामध्ये दिसतोय. त्यामुळे मात्र वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
विद्यमान आमदार रोहित पवार यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे, त्यांच्या कार्यशैलीमुळे येथील शरद पवार गटातील अनेक नेते भाजपामध्ये गेलेत. तसेच शरद पवार गटातील काही नेते अजित पवार यांच्या गटातही गेले आहेत. येथील काँग्रेस व शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे आमदार रोहित पवार यांच्यासोबत फारसे चांगले संबंध राहिलेले नाहीत.
गेल्या पाच वर्षांमध्ये या मतदारसंघात असेच चित्र पाहायला मिळाले आहे. दरम्यान आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर जामखेड नगरपरिषद जवळ महायुती मधील तीन घटक पक्ष आणि काँग्रेस तसेच ठाकरे गटाच्या चिन्हासहित हम साथ साथ है हम पाच पाच है असा नारा दिसत असल्याने चर्चांना उत आले आहे.
या बॅनरबाजीमुळे महायुती मधील तीन घटक पक्ष आणि महाविकास आघाडी मधील काँग्रेस तसेच ठाकरे गट रोहित पवार यांच्या विरोधात आहेत अशा चर्चा सध्या मतदारसंघात सुरु आहेत. तथापि हा बॅनर कोणी लावला, का लावला आणि अवघ्या दोन दिवसातच हा बॅनर का काढला गेला? याबाबत योग्य ती माहिती मिळू शकलेली नाही.
परंतु अवघ्या काही तासांसाठी लावलेला हा बॅनर मतदार संघात चर्चेचा विषय बनला आहे आणि यामुळे रोहित पवार यांच्या विरोधात महाविकास आघाडीमध्येही नाराजी आहे का अशा चर्चांना अधिकची हवा भेटली आहे.