Karjat Jamkhed Vidhansabha Nivdnuk : विधानसभेचा बिगुल वाजण्याआधीच शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्या मतदारसंघात नुकतीच एक मोठी उलथापालथ झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला आहे. हा विद्यमान आमदार रोहित पवार यांच्यासाठी एक मोठा धक्का मानला जात आहे.
निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा काळ शिल्लक असतानाच राळेभात यांनी पवारांची साथ सोडली असल्याने आगामी निवडणुकीत रोहित पवारांना कर्जत जामखेडचा गड शाबूत ठेवण्यात अडचणींचा डोंगर सर करावा लागणार आहे. महत्त्वाचे म्हणजे फक्त शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसलाच खिंडार पडले आहे असे नाही तर उबाठा शिवसेनेला देखील मोठे खिंडार पडले आहे. शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे तालुकाध्यक्ष संजय काशीद यांनी संपूर्ण तालुका कार्यकारणीसह हाती कमळ घेतले आहे.
तालुक्यातील या दोन बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश मुंबईमध्ये भाजपाच्या प्रदेश कार्यालयात झाला. दोन दिवसांपूर्वी भाजपाच्या प्रदेशात कार्यालयात राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री तथा महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे आमदार तथा कर्जत जामखेडचे माजी आमदार प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला अहमदनगर सह संपूर्ण राज्यात चांगले यश मिळाले होते. पण आता विधानसभेच्या आधीच महाविकास आघाडीला गळती लागली आहे. राळेभात व काशिद यांचा भाजप प्रवेश राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) व शिवसेना (ठाकरे गट ) या दोन्ही पक्षांसाठी मोठा धक्का देणारा ठरू शकतो असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.
हे दोन्ही नेते कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात मोठी राजकीय ताकद ठेवतात. अशा परिस्थितीत या दोन्ही नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला असल्याने यावेळी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला याचा फायदा मिळणार असा अंदाज आहे. खरंतर राळेभात आधी शिवसेनेत होते.
शिवसेनेत असताना त्यांचे काही मुद्द्यावरून पक्षासोबत बिनसले पुढे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर त्यांनी अजित दादा यांच्या समवेत न जाता मोठ्या साहेबांसोबतच राहण्याचा निर्णय घेतला. मात्र विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असतानाच त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला.
25 ऑगस्ट ला शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर राळेभात यांना भाजपकडून ऑफर मिळाली. विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांनी राळेभात यांनी भाजपामध्ये यावे अशी खुली ऑफर दिली होती. यानुसार आता राळेभात यांनी भाजपामध्ये प्रवेश घेतला आहे. यावेळी राळेभात यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली.
काय म्हटले राळेभात?
भाजपात पक्ष प्रवेश झाल्यानंतर राळेभात यांनी, ‘शिवसेनेत अनेक वर्षे राहिलोय म्हणून भारतीय जनता पक्षासोबत जुना ऋणानुबंध होताच. विधानसभा अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. त्यानंतर काही कारणास्तव शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलो. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
त्यावेळी आ. रोहित पवार यांनी आम्हाला कुकडीचे पाणी देऊ, मतदारसंघाची बारामती करू, अशी आश्वासने दिली होती. परंतु पवार यांच्याकडून घोर निराशा झाल्याने आज मी भाजपात येण्याचा निर्णय घेत आहे. त्यांच्याकडून कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नाही.
कुणाच्याही हाताला काम दिले जात नाही, मानसन्मान दिला जात नाही. त्यामुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. तसेच माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या कामाची पद्धत माहित आहे. त्यांच्याशी संबंधही चांगले असल्याने भाजपामध्ये आलो आहे,’ अशी कबुली राळेभात यांनी यावेळी दिली.