Karjat Jamkhed Vidhansabha : सध्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. कोणत्याही क्षणी भारतीय निवडणूक आयोग महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करेल असे बोलले जात आहे. नोव्हेंबर मध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. यामुळे आता महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.
कर्जत जामखेड मध्ये देखील दोन्ही गटांकडून जय्यत तयारी सुरू आहे. रोहित पवार यांना शह देण्यासाठी महायुतीचे दिग्गज उमेदवार आता मैदानात उतरले आहेत. गेल्यावेळी रोहित पवारांनी राम शिंदे यांचा पराभव केला होता.
राम शिंदे हे माजी मुख्यमंत्री तथा वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय सहकाऱ्यांपैकी एक आहेत. पण, 2019 च्या निवडणुकीत ते स्वतः त्यावेळी मंत्री असताना त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, याच पराभवाचा वचपा काढण्यासाठी आता महायुतीने कंबर कसली आहे.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांच्या काही सहकार्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतलाय. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर रोहित पवार यांना हा मोठा राजकीय धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे.
रोहित पवार यांच्या सहकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला असल्याने कर्जत जामखेड विधानसभेचे माजी आणि विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांची राजकीय ताकद आता मतदारसंघात वाढली असल्याच्या चर्चा जोर धरत आहेत. यामुळे राम शिंदे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यांनी आता रोहित पवारांवर जोरदार हल्ला चढवत ते हुकूमशाही पद्धतीने कारभार करतात असा आरोप केला आहे.
काय म्हटलेत राम शिंदे ?
रोहित पवार आपल्या सोबतच्या कार्यकर्त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक देत असल्याचा मोठा सनसनाटी आरोप राम शिंदे यांनी केला आहे. ते म्हणतात की, आमदार रोहित पवार यांची काम करण्याची पद्धत लोकांना पटलेली नाही. पवार यांच्या वर्तणुकीमध्ये हुकूमशाही आहे, अरेरावी आहे.
ते चालू बैठकीत मोबाईल, बिसलेरी आणि चाव्या अशा वस्तू फेकून मारतात. मी जर आमदार झालो नसतो तर त्यांनी नक्कीच १०-२० लोकांना मारहाण केली असती. मी विधानपरिषद आमदार झाल्यामुळे त्यांचा पारा कमी झाला आहे, त्याचा पारा अर्ध्यावर आला आहे, असं लोकच सांगतात, असा दावा शिंदे यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा उमेदवार विजयी होईल
माजी आमदार राम शिंदे यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचाच उमेदवार विजयी होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. ते म्हटलेत की गेल्या विधानसभा निवडणुकीत माझा 42000 मतांनी पराभव झाला होता. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून महाविकास आघाडीला फक्त 9000 ची लीड मिळाली आहे.
अर्थातच मतांची महाविकास आघाडीची टक्केवारी घटली असून लोकसभा निवडणुकीत आमची मतदार संघातील टक्केवारी वाढलेली आहे. म्हणून येत्या निवडणुकीत महायुतीचाच विजयी उमेदवार होणार आहे. आमच्या पक्षात गेल्या काही दिवसांमध्ये नवनवीन लोकांची भरती सुद्धा होत आहे.
यामुळे पक्षाची ताकद वाढत आहे. तसेच मी येत्या पंधरा दिवसांमध्ये मतदारसंघात गावागावांमध्ये जाऊन गावभेटी घेणार आहे. मी जनसंवाद यात्रा सुरू करणार असून यातून जनतेसोबत संवाद करणार अशी माहिती राम शिंदे यांनी दिली आहे.