Kasba by-election : पुण्यात सध्या कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीमुळे वातावरण तापले आहे. अशातच आजारी असताना देखील भाजपने खासदार गिरीश बापट यांना प्रचारात उतरवले आहे. यामुळे भाजपवर टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे.
प्रचंड आजारी असलेल्या खासदार गिरीश बापट यांना प्रचाराच्या मैदानात उतरवून भाजपा त्यांच्या जीवनाशी खेळ करत आहे, अशी टीका जगताप यांनी केली. तसेच गेल्या पाच वर्षात कोणत्याही निर्णय प्रक्रियेत गिरीश बापट यांचा समावेश करण्यात आला नाही, पण आता बापटांची भाजपाच्या नेतृत्वाला आठवण आली, असेही ते म्हणाले.
कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवारासाठी पुण्याचे खासदार गिरीश बापट प्रचारासाठी उतरले आहेत. मुळात गिरीश बापट यांची प्रकृती अस्वस्थ आहे. त्यांना त्रास होत असताना, इतर व्हायरल संसर्गापासून त्यांना दूर ठेवा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
असे असताना भाजपाच्या नेतृत्वाने त्यांना प्रचाराला येण्यासाठी गळ घातली. गिरीश बापट यांच्या जीवनाशी खेळण्याचं काम भाजपाकडून केलं जात आहे. हे पुणेकर कधीही विसरणार नाहीत, असेही जगताप यांनी म्हटले आहे.
दरम्यान, भारतीय जनता पार्टीच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी भाजपाने हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केली. आता त्यांचा जोरदार प्रचार सुरू आहे