Kasba : सध्या पुण्यात कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणूकीची चर्चा सुरू आहे. यासाठी सर्व पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आता प्रचार देखील सुरू झाला आहे. असे असताना घटनातज्ज्ञ असीम सरोदे यांनी मोठे विधान केले आहे. यामुळे उमेदवारांचे टेन्शन वाढले आहे.
ते म्हणाले, चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूक रद्द होऊ शकते. कारण शिवसेना संदर्भातील अनेक याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात १४ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. त्यामध्ये जर १६ आमदार अपात्र ठरले तर विधानसभा भंग होईल.
असे झालेच तर विधानसभा भंग झाली तर मग निवडणुकीला काहीच अर्थ राहत नाही, यामुळे आता 14 तारखेला काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. १६ आमदार अपात्र ठरले तर विधानसभा भंग होऊन राष्ट्रपती राजवट येईल, असेही त्यांनी सांगितले आहे.
सर्वोच्च न्यायालयात जर १६ आमदार अपात्र ठरले तर निवडणूक आयोगाच्या निर्णयावर परिणाम होईल, त्यामुळे आयोगाने निर्णयाची घाई करु नये, असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येई पर्यंत निकाल देऊ नये, असे म्हटले आहे.
सध्या या निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरू झाला आहे. यासाठी सर्व तयारी पक्षांनी आणि उमेदवारांनी केली आहे. असे असताना असीम सरोदे यांच्या विधानामुळे उमेदवारांचे टेन्शन वाढले आहे. यामुळ सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.