Ahmednagar News : काहीजण केवळ फोटो काढण्यापुरते मागण्यांचे निवेदन देतात. मात्र विखे कुटुंबाने जी ही आश्वासने दिलेली आहेत ती फोटोसेशन न करता पूर्ण केली आहेत.
दूध अनुदान, कांदा अनुदान, शहरातील उड्डाणपूल, बायपास आदी प्रश्न आम्ही कोणताही गाजावाजा न करता नागरिकांसाठी पूर्ण केलेले आहेत.
त्यामुळे लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधलेला उमेदवार कोण, त्याचे शिक्षण किती, त्याची कार्यक्षमता किती, त्याचं केंद्र सरकारमध्ये असलेलं वजन किती,
त्याच्या कुटुंबाचे राजकारण आणि ‘समाजकारणाचे योगदान किती, त्यांनी केलेली कामे या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे असे आवाहन नागरिकांना करत खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी विरोधकांचे नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला.
केंद्रीव मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (दि.१८) झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत कांदा निर्यात बंदी उठवण्यात आलेली आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाचे खा.सुजय विखे यांनी आभार मानले आहेत.
त्याचबरोबर मंत्री राधाकृष्ण विखे आणि खा. सुजय विखे यांनी केलेल्या प्रयत्न मुळे कांदा निर्यात बंदी केंद्र सरकारने उठवली या अनुषंगाने सोमवारी (दि.१९) शेतकऱ्यांच्या वतीने नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खा. सुजय विखे यांचे आभार मानत त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले, बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सुळ,
संचालक हरिभाऊ कर्डिले, सुरेश सुंबे, निखिल वारे, बाळासाहेब पवार, धर्माजी आव्हाड यांच्यासह जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळेस बोलताना खासदार सुजय विखे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस अजित पवार यांच्या माध्यमातून वारंवार केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेत राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी मांडण्यात आल्या.
विशेष करून नगर नाशिक पुणे पट्ट्यातील कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात असल्याने कांदा निर्यात बंदीचा फटका बसत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे असल्याची भूमिका या भागाचा खासदार म्हणून आपण मांडली.
त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनीही शेतकर्यांच्या अडचणी समजून घेत तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मोदी गॅरंटी यानुसार केंद्र सरकारने निर्णय घेतला असून कांदा निर्यात बंदी उठवण्यात आलेली आहे.
हा एक प्रकारे नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संघर्षाचा विजय असल्याचे प्रतिपादन खासदार विखे यांनी केले.
माजी मंत्री करडिले यांनी आपल्या भाषणात मोदी सरकारमुळे आपल्याला आता पुन्हा एकदा तिसऱ्यांदा दिवाळी साजरी करण्याची पर्वणी मिळाली आहे असे वक्तव्य केले.
अनेकजण टीका करायची म्हणून काहीही टीका करत असले तरी दिलेले आश्वासन पाळणे ही विखे कुटुंबाची ओळख असल्याचं कर्डिले यावेळी म्हणाले.