Kopargaon Politics : विधानसभा निवडणुकीत कोपरगाव विधानसभा मतदारसंघात यंदा पहिल्यांदाच काळे आणि कोल्हे हे दोन परंपरागत विरोधक एकमेकांच्या सोबत आहेत. यावेळी कोपरगावचे विद्यमान आमदार हे महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. युवा नेते विवेक कोल्हे आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे हे देखील भारतीय जनता पक्षातच असून ते महायुतीचा भाग आहेत.
म्हणजेच दोन परंपरागत राजकीय विरोधक सध्या महायुतीमध्ये आहेत. खरे तर कोपरगावचे राजकारण काळे आणि कोल्हे यांच्या भोवतीच फिरते. पण, यंदा प्रथमच काळे आणि कोल्हे एकाच गटात असल्याने महायुतीचे अधिकृत उमेदवार अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांच्यासाठी यंदाची निवडणूक सोपी असल्याचे मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त होत आहे.
याच दरम्यान सध्या कोपरगावात एक पत्र वेगाने व्हायरल होत आहे. या पत्रात कोपरगावकरांना एक भावनात्मक आवाहन करण्यात आले आहे. या पत्रात काळे आणि कोल्हे परिवाराचा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे. दरम्यान आज आपण सोशल मीडियामध्ये वेगाने व्हायरल होत असणाऱ्या या पत्रात नेमके काय म्हटले आहे? याबाबत थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
काय म्हटलय या व्हायरल पत्रात !
नमस्कार !
संतांची भूमी अशी या कोपरगाव तालुक्याची ओळख. प्रभू श्रीरामचंद्र, दैत्यगुरु शुक्राचार्य, गौतम ऋषी, शिर्डीचे साईबाबा, संत जनार्दन स्वामी, विश्वात्मक जंगली महाराज अशा अनेक साधुसंतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी. दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाणारी पवित्र गोदामाई याचं तालुक्यातून वाहते आणि याचं भूमीत आपलं वास्तव्य असल्याचा कोपरगावकर म्हणून आम्हाला नेहमीच अभिमान वाटत आला आहे.
याच कोपरगाव तालुक्यात कर्मवीर शंकरराव काळे साहेब आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साहेबांच्या योगदानातून कृषी, सहकार, शिक्षण आणि आरोग्य या आणि अशा अनेक क्षेत्राला बळकटी मिळून तालुक्याचा उत्कर्ष झाला आहे. या दोन्ही नेत्यांच्या योगदानामुळं आज आम्ही गुण्या गोविंदानं नांदतो आहोत.
या तालुक्यातील काळे आणि कोल्हे कुटुंबियांचा राजकीय सत्तासंघर्ष केवळ तालुक्याला, जिल्ह्याला नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. पण, २०२४ च्या विधानसभा निवडणूकीत काळे आणि कोल्हे कुटुंबीय जोडले गेल्यानं विकासाचा नवा अध्याय सुरू होत आहे. हा कोपरगावच्या जनतेसाठी धक्का असला तरी हा धक्का सुखद असून याचा आम्हाला खुप आनंद आहे.
कोपरगाव तालुक्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी या दोन्ही घराण्यांचं अनन्यसाधारण योगदान आहे. आज त्यांच्या या एकीमुळं कोपरगाव तालुक्यात कृषी, शिक्षण आरोग्य, पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती असेल अशा उज्वल भविष्याच्या शाश्वत विकासाच्या संकल्पना अधिक दृढ होतील, याचा आम्हाला विश्वास वाटतो.
आमदार आशुतोष काळेंना कोपरगाव तालुक्याला जिल्ह्यात १ नंबर करायचे आहे. त्याचे आम्ही स्वागतच करतो. गेल्या ५ वर्षात त्यांच्या कामांचा उरक पाहता ते हे स्वप्न नक्कीच साकारतील, असे एकूणच निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीतून दिसत आहे.
राजकीय सत्ता संघर्षात जनतेचे हित हे नेहमीच अग्रभागी असलं पाहिजे, हे जाणून काळे – कोल्हे कुटुंबीय जोडले गेले आहेत. ही कोपरगावच्या भरभराटीची नांदीच म्हणावी लागेल. येणाऱ्या काळात कोपरगाव तालुक्यात एका नव्या अध्यायाचा प्रारंभ या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने होत असताना आम्ही या नवीन राजकीय, सामाजिक मैत्रीचं मोठ्या आनंदानं स्वागत करतो.