मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाने एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमदेवार द्रौपदी मुर्मू यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख्य उद्धव ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. याचवेळी संजय राऊत यांनी शिंदे सरकार आणि राज्यपाल भगत सिंग कोश्यारी भूमिकेवर आक्रमकपणे टीका केली आहे. सर्वोच्च न्यायालय प्रकरण प्रलंबित असताना स्थापन झालेले हे सरकार बेकायदेशीर असल्याची टीका राऊत यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे यांच्यानंतर संजय राऊत यांनी पक्षाची भूमिका मांडली. यावेळी शिंदे सरकार घटनाबाह्य असल्याचे राऊत म्हणाले. या संदर्भात शिवसेनेतर्फे सुभाष देसाई यांनी राज्यपालांना पत्र दिले आहे. यात राज्यपालांनी इतर मंत्र्यांना शपथ देऊ नये, असे लिहले आहे, असे राऊतांनी सांगितले आहे.
39 आमदारांवर कारवाईचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयत प्रलंबित असल्याचा या पत्रात उल्लेख केला आहे. राज्यातील सरकार बेकायदेशीर असून मुख्यमंत्र्यांनी घेतलेली शपथ देखील बेकायदेशीर आहे. जर मंत्र्यांनी शपथ घेतली तर तो घटनाद्रोह होईल, असे राऊत यावेळी म्हणाले. तर दुसरीकडे शिंदे गटाला दिलासा मिळाला असे म्हणणे चुकीचे आहे. आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे, असेही राऊतांनी सांगितले आहे.