Ahmednagar Politics : योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार आहे. लाडक्या बहिणी महायुतीमधील भावांच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या राहाणार असल्यामुळे महाविकास आघाडीचे नेते सैरभैर झाले आहेत. निवडणुकीच्या काळात खटाखट पैसे देण्याचे आश्वासन देणारे महाविकास आघाडीचे नेते पटापट पळून गेले असल्याचा टोला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला.
राहाता पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण माजीमंत्री आ. पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत झाले. कार्यक्रमास आ. आशुतोष काळे, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.
मंत्री विखे म्हणाले, स्व. माजी खा. पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील आणि गोपीनाथ मुंडे यांची राजकारणापलिकडची मैत्री होती. दोघांच्याही राजकीय भूमिका आणि मत अतिशय स्पष्ट होते. दोघांनीही केलेल्या संघर्षाची त्यांना किंमतही मोजावी लागली; पण ते त्यांच्या लढाईपासून मागे हटले नाही, याची आठवण करुन देत, या संघर्षमय विचारांचा वारसा पुढे घेऊन जात पंकजाताईंनी आपले स्वतःचे कतृत्व आणि नेतृत्व राज्यात सिद्ध करुन दाखविले असल्याचे त्यांनी सांगितले.
आ. मुंडे म्हणाल्या की, राज्यात ९८ पंचायत समितींच्या इमारतींकरीता ४३० कोटी रुपयांचा निधी आपण उपलब्ध करुन दिला. ३ लाख ७० हजार महिला बचत गट निर्माण करुन त्यांना ४ हजार २०० कोटी रुपयांचे अनुदान मंजुर करुन दिले.
मुंडे साहेबांच्या प्रेरणेमुळेच राज्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची अंमलबजावणी सुरु झाली. सुमारे १४ हजार कोटी रुपये प्रधानमंत्री ग्रामसडक येजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागाला मिळवून दिल्याचे त्यांनी सांगितले.