Maharashtra Politics Sharad Pawar And Eknath Shinde News : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या माध्यमातून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. महायुती सरकारने लोकसभा निवडणुकीच्या पराभवातून धडा घेत विधानसभा निवडणुकीकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. महाविकास आघाडीने देखील गेल्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर विधानसभा निवडणुकीकडे आपला मोर्चा वळवला आहे.
अशातच एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितला आहे. यासाठी शरद पवार यांनी मुख्यमंत्री महोदयांना पत्रही लिहिले आहे. मात्र, शरद पवार यांचे मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेण्याचे कारण काय ? या भेटीत पवार कोणत्या विषयावर चर्चा करणार आहेत? याच संदर्भात आता आपण माहिती पाहणार आहोत.
भेट घेण्याचे कारण काय ?
शरद पवार यांनी सोशल मीडिया वरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी आपण वेळ मागितला असल्याची माहिती दिली आहे. खरंतर, भेट मिळावी यासाठी प्रयत्न करूनही शरद पवारांना मुख्यमंत्री महोदय यांचा वेळ मिळालेला नाही. यामुळे अखेरकार शरद पवार यांनी पत्र लिहून मुख्यमंत्री महोदयांकडे भेटीसाठी वेळ मागितला आहे. ही भेट घेण्याचे कारणही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. पवार यांनी सांगितल्याप्रमाणे, “महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी तयारी करत आहेत.
पण या स्पर्धा परीक्षेत विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. म्हणून यातून मार्ग काढणे खूपच आवश्यक आहे. याच विद्यार्थ्यांमधील असंतोष आणि काही दिवसापूर्वी झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या रास्त मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी, तसेच स्पर्धा परीक्षा लवकरात लवकर घेण्याकरिता राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून भेटीची मागणी केली आहे.”
पवार यांनी लिहिलेल्या पत्रात काय म्हटलंय?
पवार यांनी आपल्या पत्रात असं सांगितलंय की, राज्यात 32 लाखाहून अधिक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत. हे लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसाठी अहोरात्र काबाडकष्ट करत आहेत. दरम्यान या विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेची भरती प्रक्रिया वेळेवर व्हावी, उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना वेळेवर नियुक्ती मिळावी ही इच्छा आहे. मात्र सद्यस्थितीला विद्यार्थ्यांची ही इच्छा पूर्ण होत नाहीये.
राज्यात अनेक पदाच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. काही परीक्षांच्या जाहिराती प्रलंबित आहेत, तसेच काही परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यास विलंब होत आहे. यामुळे स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. यामुळे पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितली आहे. यासंदर्भात लिहिलेल्या पत्रात त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहेत, याबद्दलही भाष्य केले आहे.
विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहेत?
1) स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आयबीपीएस ची एक्झाम आणि राज्यसेवेची एक्झाम एकाच दिवशी येत असल्याने राज्यसेवेची एक्झाम पुढे ढकलावी तसेच या परीक्षेत कृषी विभागाच्या 258 जागांचा समावेश करावा ही मागणी उपस्थित केली जात होती. यासाठी पुणे येथे संबंधित विद्यार्थ्यांनी आंदोलनही केले होते. दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यसेवा आयोगाने 2024 मध्ये नियोजित असलेल्या राज्यसेवेच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. मात्र या परीक्षा नेमक्या कधी होणार याबाबत आयोगाने अजून तारीख जाहीर केलेली नाही. सोबतच कृषी विभागातील 258 जागांचा राज्यसेवेच्या या परीक्षेत समावेश करण्याबाबतही आयोगाकडून स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. आता ऑक्टोबर मध्ये विधानसभेच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता जाहीर होणार आहे यामुळे याबाबत तत्काळ निर्णय व्हावा अशी मागणी आहे.
2) गट ब आणि गट क ची संयुक्त पूर्व परीक्षा एप्रिल किंवा मे महिन्यात होणे अपेक्षित असते. मात्र यावर्षी अजून याची जाहिरात सुद्धा प्रसिद्ध झालेली नाही. तसेच या परीक्षेत आणखी काही पदांची वाढ व्हावी अशी मागणी विद्यार्थ्यांची आहे.
3) राज्यसेवा, कृषी सेवा, पोलिस उपनिरिक्षक, विक्रीकर सहाय्यक सारख्या सरळ सेवेतील काही पदांवर निवड होऊनही अनेकांना नियुक्ती मिळालेली नाही. यामुळे या संबंधित पात्र उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्ती मिळावी अशी मागणी विद्यार्थ्यांची आहे.
4) विविध विभागातील लिपिक पदांकरीता ७००० हून अधिक जागांची भरती प्रक्रिया अन अन्य भरती प्रक्रिया न्यायालयीन प्रकरणांत अडकलेल्या आहेत. यावरही लवकरात लवकर निर्णय व्हावा अशी मागणी आहे.
5) राज्यात शिक्षक तसेच प्राध्यापकांच्या बहुतांशी जागा रिक्त आहेत. यामुळे या रिक्त जागांचा नव्याने आढावा घेऊन शिक्षक तसेच प्राध्यापक भरतीला गती मिळावी अशीही मागणी उपस्थित करण्यात आली आहे.