Maharashtra Vidhan Sabha Nivdnuk : लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्राला वेध लागले आहे ते विधानसभेच्या निवडणुकीचे. आतापासूनच विधानसभा निवडणुकीचे पडघम सुद्धा वाजू लागले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी आगामी निवडणुकीसाठी आत्तापासूनच कंबर कसली आहे. अशातच, आता विधानसभा निवडणुकी संदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर आली आहे.
आतापर्यंत अनेक प्रतिष्ठित वृत्तसंस्थांनी विधानसभेची निवडणूक ऑक्टोबर मध्ये होणार असे म्हटले होते. ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात म्हणजेच दिवाळीच्या आधीच निवडणूक होणार असे सांगितले जात होते.
मात्र, निवडणुकीबाबत आता एक नवीन अपडेट समोर आली आहे. सूत्रांच्या हवाल्यानुसार एका प्रतिष्ठित वृत्तसंस्थेने विधानसभेच्या निवडणुका दिवाळीच्या नंतर होणार असल्याचा दावा केला आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच दिवाळीनंतर विधानसभेच्या निवडणुका होणार असे म्हटले जात आहे.
अर्थातच दिवाळी साजरी झाली की मगच नवीन सरकारचा गुलाल उडणार आहे. नियमानुसार, 26 नोव्हेंबर 2024 ला 2019 मध्ये अस्तित्वात आलेल्या विधानसभेचे विसर्जन होणार आहे. अर्थातच 26 नोव्हेंबर पर्यंत महाराष्ट्राची नवीन विधानसभा स्थापित होणे आवश्यक आहे.
म्हणून ऐन पावसाळ्यात आचारसंहिता, प्रचाराचा धुराळा कशासाठी, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. हेच कारण आहे की भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आता नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणूक घेतली जाणार अशी खात्रीलायक बातमी समोर आली आहे.
सध्या स्थितीला भारतीय निवडणूक आयोगात राज्याच्या विधानसभा निवडणुकीबाबत कोणत्याच हालचाली पाहायला मिळत नाहीयेत. तसेच सत्ताधारी महायुतीच्या माध्यमातून दिवाळीनंतरच निवडणुका घेतल्या गेल्या पाहिजेत असा सूर आवळला जात आहे. तथापि अंतिम निर्णय हा भारतीय निवडणूक आयोगाचा राहणार आहे.
निवडणूक आयोगामध्ये सध्या तरी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही हालचाली दिसत नाहीयेत. यामुळे यंदाची निवडणूक दिवाळीनंतरच होणार असल्याचे म्हटले जात आहे. दिवाळी 3 नोव्हेंबरला संपणार आहे.
यानंतर मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईल आणि 14 किंवा 15 नोव्हेंबरला रिझल्ट लागेल असं बोललं जात आहे. पण, या निवडणुकीसाठीची आचारसंहिता 12 ऑक्टोबर पर्यंत लागू होऊ शकते. कारण की, आचारसंहिता लागू झाल्यानंतर 45 दिवसांनी विधानसभा अस्तित्वात येणे आवश्यक असते.
तथापि भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती हाती आलेली नाही. यामुळे विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक नेमके कसे राहणार हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे.