Mahayuti Ahmednagar News : लोकसभा निवडणुकीनंतर आता लवकरच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांची लगीन घाई सुरू होणार आहे. लोकसभेचा गुलाल खांद्यावरून खाली येत नाही तोवर विधानसभेच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार असे चित्र आता तयार होत आहे. अशातच राज्यातील राजकीय वातावरण देखील तापत आहे.
महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही गटांमध्ये सध्या जागा वाटपावर जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अशातच महायुतीचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. आठवले गटाने महायुती मधील जागावाटपाआधी निर्वाणीचा इशारा दिला आहे.
आठवले गटाने महाराष्ट्रातील राखीव मतदार संघातून किमान 20 ते 22 जागा मिळायला हव्यात अशी भूमिका मांडली आहे. महाराष्ट्रातील विधानसभेचे 38 मतदारसंघ राखीव आहेत. यापैकी आम्हाला 20-22 जागा मिळाव्यात असे स्पष्ट केले आहे.
नगर जिल्ह्यात आमची ताकद मोठी आहे. आम्ही ज्यांच्या सोबत असतो त्यांचीच सत्ता येते. श्रीरामपूरची जागा राखीव असून ही आम्हाला मिळायला हवी अशी मागणी आठवले गटाकडून केली जात आहे.
तसेच, जर आम्हाला जागा मिळाली नाही तर आम्हाला महायुतीने गृहीत धरू नये, असा इशारा सुद्धा आठवले गटाकडून देण्यात आला आहे. आरपीआयचे नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी हा निर्वाणीचा इशारा दिला आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाकडून 65 वा वर्धापन दिन सोहळा निमित्त जामखेड येथे प्रभारी जिल्हा अध्यक्ष सुनील साळवे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना सुनील साळवे यांनी ही भूमिका मांडली आहे.
यावेळी बोलताना साळवे यांनी महायुतीत सहभागी होताना 10 टक्के वाटा हा शब्द देण्यात आला होता पण सत्ताधारी आता तो शब्द पाळत नाहीत. यामुळे कार्यकर्ते आक्रमक होत आहेत. दरम्यान, आम्ही आमच्या भावना आमचे नेते आठवले साहेबांना कळवल्या आहेत असं साळवे यांनी यावेळी सांगितले आहे.
त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भूमिके नंतर रामदास आठवले काय करणार, जर आठवले यांनी महायुतीकडे कार्यकर्त्यांच्या इच्छेप्रमाणे जागांची मागणी केली तर महायुती काय निर्णय घेणार या साऱ्या गोष्टी पाहण्यासारख्या राहणार आहेत.