Ahmednagar Politics : पक्षाचे चिन्ह व निवडणूक या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या. कारण चिन्ह व जनमानसाच्या भावना दृढ झालेल्या असतात. त्यामुळे नवीन चिन्ह असणाऱ्यांना निवडणुका जरा कष्टाच्या जातात.
दरम्यान राजकीय व्यक्ती मात्र त्यासाठी विविध क्लृप्त्या लढवत असतात. अहमदनगरच्या राजकारणात अशाच काही गोष्टी घडून गेलेल्या आहेत. त्यातील एक म्हणजे दिवंगत मंत्री शंकरराव कोल्हे यांनी वापरलेल्या अफलातून
क्लुप्त्या. १९७२ साली ते अपक्ष आमदार म्हणून विधानसभेत गेले त्यावेळच्या आहेत या गोष्टी. काँग्रेसचे के. बी. रोहमारे यांच्याविरुद्ध लोकांनी त्यांना आग्रह करून उभे केले होते. या निवडणुकीत त्यांना ‘सिंह’ हे चिन्ह मिळाले होते. हे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवायसाठी त्यांनी अनेक अफलातून गोष्टी केल्या होत्या असे लोक सांगतात.
कोल्हे यांचा पराभव व्हावा म्हणून रोहमारे यांनी गोदावरी तिरावर दत्ताच्या पारावरील घाटावर ब्राह्मणांना यज्ञ करायला सांगितले. १०५ ब्राह्मण यज्ञाला बसविले. याची गावात चर्चा झाली. याला उत्तर कसे द्यायचे? हा कोल्हेंसमोर प्रश्न होता.
भगवान साबळे नावाचे कोल्हे यांचे एक मित्र होते. त्यांनी एक युक्ती काढली. जोशी लोक काळी टोपी, धोतर घालतात. उभा गंध लावतात. ते लोकांना भविष्य सांगतात. असे २५- ३० ज्योतिषी शोधून कोल्हेंनी त्यांना गावात बसविले.
लोक चार आणे टाकून त्यांना भविष्य विचारत. ते भविष्य सांगत. तेथे काही भविष्य विचारणारी माणसंही जाणीवपूर्वक बसवली जात असे. हे लोक जोशी लोकांना विचारात ‘बैलजोडी येईल की सिंह? काँग्रेसचे चिन्ह बैलजोडी होती व कोल्हे यांचे सिंह. असा प्रश्न
विचारताच सगळेच ज्योतिषी सांगत सिंह येईल. नदीवरील यज्ञापेक्षा या भविष्याची गावात जोरदार चर्चा झडायची. कोल्हेंनी काही भविष्य सांगणारे पोपटवालेही बसविले. या पोपटाला पैसे देऊन कोण येणार ती चिठ्ठी काढायला लावली जायची. पोपट चिठ्ठी काढायचा.
ती सिंहाची निघायची. कारण पिंजऱ्यात सगळ्या चिठ्ठया या सिंहाच्याच होत्या. निवडणुकीच्या काळात कोपरगावात एक सर्कस आली होती. त्या सर्कसमध्ये सिंह होता. कोल्हेंनी युक्ती करून सर्कसमधील सिंहच बाजारपेठेतून फिरविला.
नंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यावर आक्षेप घेतला. पण तोवर सिंह फिरवून झाला होता. नंतर प्रचारात काही सिंहाचे मुखवटेच आणले गेल्याचे लोक सांगतात. अशा विविध क्लृप्त्या वापरून ही निवडणूक कोल्हे जिंकले होते.