Mangaldas Bandal : पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल यांनी मोठी घोषणा केली आहे. ते म्हणाले, कुणी कितीही अडविण्याचा प्रयत्न केला तरी राजकारणातून बाजूला जाणार नाही. आगामी सर्व निवडणुका सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन लढविणार असल्याचे त्यांनी आज येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले.
सध्या राज्यातील राजकीय स्थिती गोंधळाची आहे, त्यामुळे आगीतून उठून फुफाट्यात पडायचे, जाणीवपूर्वक टाळत असल्याचे सांगताना आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याचे सूतोवाचही त्यांनी केले. यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ते इच्छुक असल्याचे दिसून आले.
ते म्हणाले, वीस महिने मला कारावास भोगायला लावला यामागे कोण आहे, हे शिरूर तालुक्यातील जनतेला चांगलेच ठाऊक आहे. प्रशासनातील हुशार, उच्चशिक्षित, बीएस्सी ॲग्री माणसाकडून ही अपेक्षा नव्हती.
राजकारणात मतभेद असतात, पण वैरत्व असू नये. तालुक्यातील काही लोक डोळ्यात गेले तर खूपत नाहीत, पोटात गेले तर दुखत नाहीत पण करणीला कधी चुकत नाहीत, अशा प्रवृत्तीचे आहेत. माझ्याकडे अनेक पुरावे आहेत, न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास असून, माझ्यावरील केसेस खोट्या आहेत, हे न्यायदेवतेच्या दरबारात सिद्ध होईल.
दरम्यान, मंगलदास बांदल यांना नुकताच जामीन मिळाल्याने ते आज पत्रकार परिषदेत नक्की काय बोलणार याकडे सर्व शिरुर तालुक्यातील पुढाऱ्यांचे लक्ष लागले होते. मंगलदास बांदल हे पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी मागील 22 महिन्यांपासून कारागृहात असताना त्यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला.