कोरोनाच्या काळात दिवसागणिक वाढणाऱ्या रूग्णसंख्येमुळे प्रशासनही हतबल झाले होते. मात्र या बिकट प्रसंगी आ. लंके यांनी मात्र न डगमगता हे आव्हान स्विकारत कार्जुले हर्या व भाळवणी येथे अवघ्या दोन दिवसांत ११०० बेडचे कोविड सेंटरची उभारणी केली.
अन त्या माध्यमातून हजारो नागरिकांना मोफत उपचार करून बरे केले. कोरोना रेस्क्यू ऑपरेशनमधील आ. नीलेश लंके यांनी दिलेल्या या योगादनाची फ्रान्सच्या थेम्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीने दखल घेत त्यांना ‘होरोनरीस कॉसा डॉक्टरेट’ या मानद पदवीने सन्मानीत करण्यात आले.
मार्च २०२० मध्ये कोरोना महामारीने जगभर थैमान घातल्यानंतर आ. नीलेश लंके यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोना बाधितांवरील उपचारासाठी स्वतःला झोकून दिले.
सरकारकडून लॉकडाऊन जाहिर करण्यात आल्यानंतर हातावर पोट असलेल्या नागरिकांसाठी त्यांनी अन्नछत्र सुरू करून त्यांची उपासमार होऊ दिली नाही.
लॉकडाऊनमुळे परराज्यांमधील नागरीक त्यांच्या घरी परतत असताना त्यांच्या भोजनाची, निवासाची व्यवस्था करण्यासाठी आ. लंके यांनी पुढाकार घेतला. नगर-पुणे, नगर-कल्याण महामार्गावरून परराज्यात अनवानी जाणाऱ्या वाटसरूंना चपलांचीही त्यांनी व्यवस्था केली.
कोरोना रूग्णसंख्या वाढू लागल्यानंतर लंके यांच्या संकल्पनेतून कर्जुलेहर्या व भाळवणी येथे कोविड सेंटर उभारून त्या माध्यमातून त्यांनी हजारो रूग्णांसाठी मोफत उपचार उपलब्ध करून दिले.
राज्य, देशभरातील अनेकांकडून लंके यांच्या या रूग्णसेवेचे कौतुक झाले. तसेच या योगदानाची देश विदेशात दखल घेतली जाऊन त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले.