राजकारण

मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए…राष्ट्रवादीतील बडी मुन्नी कोण ? विचारल्यावर अजितदादा भडकले…

१० जानेवारी २०२५ मुंबई : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड, धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांचा धुरळा उडवून देणारे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादीतील बडी मुन्नीचा उल्लेख केल्यामुळे हंगामा सुरू झाला आहे.

बडी मुन्नीबरोबरच धस यांनी डार्लिंगचाही उल्लेख केला होता.यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील ही बडी मुन्नी कोण, तिची डार्लिंग कोण, याबद्दल प्रसार माध्यमांनी गुरुवारी थेट उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनाच पुण्यात विचारल्यावर अजितदादा प्रचंड भडकले.

संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातले राजकीय आणि सामाजिक वातावरण पार ढवळून निघाले आहे.जातीय संदर्भामध्ये ही हत्या गुरफटली गेली असून, राजकीय नेत्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी या हत्येतील आरोपींचा धनंजय मुंडे यांच्याशी कथित संबंध असल्याचा आरोप करत, मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

संतोष देशमुख हत्याप्रकरणी सीआयडी, एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी होत आहे. या प्रकरणात जर कोणी दोषी असेल, तर त्यांना पाठिशी घालणार नाही. या प्रकरणात आम्ही कोणालाच सोडणार नाही.अजित पवार दोषी असतील, तर त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येणार आहे.

पक्ष न पाहता दोषीवर कारवाई केली जाणार आहे.आम्ही हत्या प्रकरणात राजकारण आणणार नाही, असे अजितदादांनी म्हटले आहे. धनंजय मुंडे राजीनामा देत नसल्याचे पाहून धस यांनी काही दिवसांपूर्वी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच, ‘क्या हुआ तेरा वादा,’ असे विचारत लक्ष्य केले होते.

अमोल मिटकरी आणि सुरज चव्हाण ही जलवाडीतील पोरं आहेत, यांना कशाला माझ्यावर बोलायला सांगता, राष्ट्र‌वादीतील बडी आणि बदनाम मुन्नीने समोर येऊन बोलावे, मग मी बघतो, असे म्हणत मिटकरी आणि चव्हाण यांचा बोलवता धनी कुणीतरी वेगळ्ळाच आहे, असे संकेत धस यांनी दिले होते.

अजितदादांनी घेतला समाचार

सुरेश धस म्हणतात ती बडी मुन्नी कोण ? असे अजितदादांना थेट विचारताच ते भडकून म्हणाले, ‘बडी मुन्नी कोण हे सुरेश धस यांनाच विचारा. कुणी फालतू गोष्टी बोलत असेल तर मी स्पष्ट नाव घेऊन बोलणारा आहे. त्यामुळे त्यालाच विचारा तो कुणाबद्दल बोलत आहे.’

काय म्हणाले होते सुरेश धस

राष्ट्रवादीत एक बडी मुन्नी आहे आणि त्या मुन्नीला म्हणा तू इथे ये. मिटकरी, सुरज चव्हाण या लहान पोरांना बोलायला लावते. मला माहिती आहे आणि मुन्नीला माहिती आहे, मी कोणाबद्दल बोलत आहे, असे धस यांनी म्हटले होते. ही मुन्नी म्हणजे एक पुरुष असल्याचेही त्यांनी गुरुवारी सांगितले.

Sushant Kulkarni

Published by
Sushant Kulkarni