Shrigonda Politics : स्व. शिवाजीराव नागवडे यांनी कारखान्याच्या माध्यमातून सहकार, शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्यातून ठसा उमटविला असून, त्यांचे कार्य गौरवास्पद आहे. स्व. बापूंनी जीव ओतून सहकारात काम केले आहे. तालुक्याच्या विकासात त्यांचं मोठ काम असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी केले.
तसेच राजेंद्र नागवडे यांनी त्यांच्यासारखे जीव ओतून काम करावे, पुढील काळात मी नागवडे कुटुंबाच्या पाठीशी आम्ही ठाम उभा राहणार असल्याचे सूचक वक्तव्य आगामी निवडणुकांच्या दृष्टीने ना. अजित पवार यांनी केले.
नागवडे कारखान्याचे संस्थापक,माजी आमदार, साखर संघाचे दिवंगत अध्यक्ष स्व. शिवाजीराव नागवडे (बापू) यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त श्रीगोंदा कारखाना कार्यस्थळावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे होते.
यावेळी आ. बबनराव पाचपुते, आ.निलेश लंके, आ.संग्राम जगताप, जिल्हा बँक संचालिका अनुराधा नागवडे, राज्य बाजार समिती सभापती बाळासाहेब नाहाटा, वीरधवल जगदाळे, मा. आ. रमेश आप्पा थोरात, सीताराम गायकर, दादापाटील फराटे, जेष्ठ नेते बाबासाहेब भोस, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड उपस्थित होते.
अनुराधा विधानसभा लढविण्याचा दादांचा पुनरुच्चार !
नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे म्हणाले, स्व. स्व. बापूंनी सहकाऱ्यांच्या मदतीने तालुक्यात सहकारासह शिक्षणाचे मोठे जाळे उभारले आहे. कुकडी आणि घोडच्या पाण्यासाठी मोठा लढा उभा करत श्रीगोंदा तालुक्याला दिशा देण्याचे काम केले.
सहकारासह शिक्षणात तालुक्याच्या पाठीशी स्व. बापू खंबीर उभे राहिले असल्याचे सांगत २०१९ साली विधानसभा निवडणुक लढविण्याची अपेक्षा होती, मात्र काही कारणास्तव माघार घ्यावी लागली होती.
मात्र २०२४ मध्ये अनुराधा नागवडे विधानसभा लढविणार असल्याचा ठाम निर्णय घेतला असून ना. अजित पवार यांना पाठीशी हात राहू देण्याची विनंती केली.
नाहटा कुटुंबाची ना. पवार यांच्याशी जवळीक चर्चेचा विषय..
राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित युवा प्रदेश उपाध्यक्ष मितेश नाहटा यांना आपल्या सोबत पुणे येथे हेलिकॉप्टरने घेऊन गेल्याने नाहटा कुटुंबाची ना. पवार यांच्याशी होत असलेली जवळीक देखील तालुक्यात चर्चेचा विषय झाला होता.