Nanded : सध्या राज्यात एक नवीन पक्ष आपले पाय रोवण्याच्या तयारीत आहे. बीआरएस पक्षाकडून उद्या नांदेडमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची उद्या नांदेड जिल्ह्यात जाहीर सभा होणार आहे.
यामुळे आता या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. असे असताना आता ही सभा होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. याचे कारण म्हणजे मनसेने आता ही सभा होऊन देणार नसल्याचे सांगितले आहे.
सुरुवातीपासूनच चर्चेत आलेल्या के. चंद्रशेखर राव यांच्या सभेला आता मनसे विरोध केला आहे. याचे कारण देखील समोर आले आहे. येथील धर्माबादजवळील बाभळीच्या पाण्याचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही, तोपर्यंत के. चंद्रशेखर राव यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा मनसेने दिला आहे.
याबाबत मनसेचे नांदेड जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंग जहागीरदार यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले, सीमेवरील गावांमधील मराठी भाषिकांवर अन्याय, बाभळी पाणी प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले असल्याचे म्हणत बीआरएस राज्याच्या राजकारणात येत आहे.
यामुळे जोपर्यंत नांदेड जिल्ह्याच्या धर्माबादजवळील बाभळीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार नाही, तोपर्यंत बीआरएस आणि त्यांचे मुख्यमंत्री केसीआर यांना नांदेडमध्ये पाय ठेवू देणार नाही. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.