साधारण दोन ते तीन महिन्यात लोकसभेच्या निवडणूक होतील. यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील लोकसभेची दक्षिणेची जागा कोण लढवणार ? खा.सुजय विखे यांना कोण प्रतिस्पर्धी असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान या जागेवर काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या तीनही पक्षांमधील कार्यकर्त्यानी सध्यातरी दावा केला आहे. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी आमदार प्राजक तनपुरे यांनी स्पष्टीकरण दिल आहे.
लोकसभेला अहमदनगर साठी रोहित पवार, सुप्रिया सुळे?
सध्या लोकसभेला दक्षिणसाठी कोण उमेदवार हवा किंवा असेल याबाबत विविध चर्चा राष्ट्रवादीच्या घडत आहेत. यासाठी विविध नावे समोर येत आहेत. मध्यंतरी आ. रोहित पवार, खा. सुप्रिया सुळे यांची नावेही चर्चेत आघाडीवर होते. तसेच ही जागा घेण्यासाठी काँग्रेसही आग्रही होते. आता नगरची जागा राष्ट्रवादीचीच असल्याचे आ. तनपुरे यांनी स्पष्ट केले.
तसेच या जागेवर उमेदवार देखील जिल्ह्यातीलच असेल बाहेरचा उमेदवार आणण्याची आवश्यकता नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सध्या तरी रोहित पवार, सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा नाही हे स्पष्ट झाले आहे. तीन व चार जानेवारीला शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिराच्या पार्श्वभूमीवर तनपुरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांना हात घातला.
खा. सुजय विखेंवरही घणाघात !
सध्या खा. सुजय विखे हे साखर वाटप करत आहेत. यावर त्यांना विचारले असता, साखर वाटपाच्या मुद्यावर, तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे. त्यांनी हत्तीवरून साखर वाटावी. परंतु खासदार विखे यांनी साखर वाटताना कांदा निर्यात बंदी, दूधभाव यावर देखील बोलावे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलावे असा घणाघातही केला आहे.
माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांवरही टीकास्त्र
जिल्हा बँकेमधील काही घडामोडींवरून आ. तनपुरे यांनी माजी आ. शिवाजी कर्डीले यांच्यावर निशाणा साधला. संगणक प्रणालीबाबत बोलताना ते म्हणाले की, जिल्हा बँकेमध्ये १०७ कोटींच्या संगणक प्रणालीवर खर्च होणार होता. परंतु संचालकांनी बँकेचे पुढील धोके ओळखून विरोध केला आहे. चेअरमन म्हणजे जिल्हा बँक नाही. त्यांच्या कामाची पद्धत मी बाजार समितीत पाहिली ते नियम डावलूनच कामे करतात असा मोठा घणाघात त्यांनी केला आहे.