राजकारण

नेवासा विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये ठिणगी पडणारच, भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार गट उमेदवारीवरून भिडणार?

Nevasa Nivdnuk : निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. अहिल्या नगर जिल्ह्यातील नेवासा विधानसभा मतदारसंघातही असेच चित्र सध्या पाहायला मिळतय. खरेतर, नुकताच काही दिवसांपूर्वी महायुतीमध्ये समाविष्ट असणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आपल्या अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

या पहिल्या यादीत 99 उमेदवारांचा समावेश असून अहिल्यानगर जिल्ह्यातील पाच उमेदवारांची नावे या यादीत पाहायला मिळालीत. मात्र नेवासा मतदारसंघातील उमेदवाराचे नाव यामध्ये नव्हते. खरंतर नेवासा विधानसभा मतदार संघात भाजपाचे माजी आमदार आहेत.

यामुळे ही जागा महायुती कडून भाजपाच्या वाटेला जाईल असे म्हटले जात आहे. पण भारतीय जनता पक्षाने पहिल्या यादीत नेवासा विधानसभा मतदारसंघातून उमेदवाराची घोषणा केली नाही यामुळे या जागेवरून महायुतीमध्ये पेच आहे कां अशा चर्चांना ऊत आला आहे.

नेवासा विधानसभा मतदार संघासाठी महायुती मधील शिंदे गट आणि अजित पवार गट देखील इच्छुक आहे. शिंदे गटाकडून प्रभाकर शिंदे यांचे नाव चर्चेत आहे. भाजपकडून माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे हे निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असून त्यांनी यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.

भाजप आणि शिंदे गटासोबतच अजित पवार गटाने देखील या जागेसाठी चाचपणी सुरू केली आहे हे विशेष. ठाकरे गटाचे शंकरराव गडाख हे नेवासा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. गडाख यांचा हा बालेकिल्ला समजला जातो. मात्र 2014 मध्ये येथून बाळासाहेब मुरकुटे हे विजयी झाले होते.

2019 मध्ये मात्र पुन्हा एकदा गडाख यांनी आपला हा बालेकिल्ला ताब्यात घेतला. क्रांतिकारी शेतकरी पक्षाची स्थापना करून गडाख यांनी हा बालेकिल्ला परत मिळवला. पुढे त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. त्यांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्री पदही मिळाले. सध्या ते उद्धव ठाकरे यांच्या समवेत आहेत.

महत्वाचे म्हणजे ठाकरे गटाकडूनच आपण निवडणूक लढवणार असे त्यांनी जाहीर केले असून ठाकरे गट विद्यमान आमदारांनाचं उमेदवारी देणार आहे. गडाख यांची उमेदवारी ही फिक्स आहे मात्र महायुतीकडून कोण याबाबत अजून निर्णय झालेला नाही. येथून भाजपाचे बाळासाहेब मुरकुटे हे माजी आमदार राहिले आहेत.

मुरकुटे यंदाही विधानसभा लढवण्यासाठी सज्ज आहेत. मात्र शिंदे गटाकडून प्रभाकर शिंदे यांच्याही नावाची चर्चा सुरू असून शिंदे यांनीही तिकिटासाठी जोरदार फिल्डिंग लावली असल्याचे बोलले जात आहे. राजकीय विश्लेषकांकडून या मतदारसंघात भाजप शिवसेनेचा उमेदवार उतरवून येथे शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना घडवून आणू शकते असा सुद्धा दावा होत आहे.

दुसरीकडे भाजपाचे माजी आमदार मुरकुटे यांनी अजित पवार यांच्या समवेत अजित पवार गटाच्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेतली आहे. त्यामुळे मुरकुटे यांनी काही दुसरा मार्ग शोधायला सुरुवात केली आहे का अशा चर्चा रंगत आहेत.

मुरकुटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट किंवा भाजपाने ही जागा लढवावी असा आग्रह धरला असून याच अनुषंगाने मुरकुटे यांच्याकडून अजित पवार गटाच्या पक्षश्रेष्ठींच्या भेटी घेतल्या जात आहेत. मात्र या सर्व गोष्टी पडद्याआड घडलेले आहेत यामुळे जेव्हा महायुतीकडून या जागेवर उमेदवाराची घोषणा होईल तेव्हाच या पडद्याआडील घडामोडी समोर येणार आहेत.

तथापि महायुतीमध्ये नेवासा मतदारसंघाच्या जागेवरून थोडासा पेच असल्याचे या निमित्ताने स्पष्ट होत आहे. महाविकास आघाडी कडून विद्यमान आमदार शंकरराव गडाख यांनी मात्र प्रचाराला सुरुवात केली असून संपूर्ण मतदारसंघ ते पिंजून काढत आहेत. यावरून प्रचारात त्यांनी आघाडी घेतली असल्याचे स्पष्ट होते.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts