Nilesh Lanke : येत्या काही दिवसात लोकसभेच्या निवडणुका सुरु होणार आहेत. मार्च महिन्याला सुरुवात झाली असल्याने आता निवडणूक आयोगाच्या माध्यमातून कोणत्याही क्षणी लोकसभेच्या तारखा जाहीर केल्या जाऊ शकतात. यामुळे साहजिक निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. राजकीय पक्षांच्या माध्यमातून लोकसभेसाठी उमेदवारांची यादी तयार केली जात आहे.
दुसरीकडे विविध पक्षांमधील लोकसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांनी देखील आपली इच्छा बोलून दाखवली आहे. यामुळे सध्या देशभरात राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळले गेले असल्याचे चित्र आहे.
याचे कारणही तसे खासच आहे, लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभेच्या देखील निवडणुका सुरू होणार आहेत. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या आधीच अहमदनगर जिल्ह्यात एक मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळाली आहे. यामुळे, राजकीय वर्तुळात चर्चांना मोठे उधाण आले आहे.
खरे तर, जिल्ह्यात शिर्डी लोकसभा आणि नगर दक्षिण लोकसभा अशा दोन जागा आहेत. या दोन जागेपैकी शिर्डी लोकसभेची जागा महायुतीकडून एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, नगर दक्षिण लोकसभेची जागा भाजपाच्या वाट्याला येणार आणि या जागेसाठी पुन्हा एकदा वर्तमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना तिकीट मिळणार अशा चर्चा आहेत.
जाणकार लोकांनी डॉक्टर सुजय विखे आणि त्यांचे वडील राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे दिल्ली दरबारी असणारे घनिष्ठ संबंध पाहता लोकसभेचे तिकीट त्यांनाच मिळू शकते असे सांगितले आहे. मात्र डॉक्टर सुजय विखे यांच्यासाठी महायुती मधूनच आव्हान उभे होत आहे.
त्यांच्या विरोधात महायुती मधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार यांच्या गटातील पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी शड्डू ठोकला आहे. त्यांनी नगर दक्षिण मधून लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे आगामी लोकसभेसाठी निलेश लंके लवकरच हाती तुतारी घेणार अशा चर्चा आहेत.
म्हणजेच निलेश लंके पुन्हा एकदा माघारी परतत शरद पवार यांच्या गटात सामील होऊ शकतात अशा चर्चा रंगत आहेत. या चर्चा रंगण्याचे कारणही तसे खासच आहे. पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी मंजूर करून आणलेल्या विविध विकास कामांच्या एका बॅनरवर शरद पवार यांचा फोटो झळकला होता.
एवढेच नाही तर “आमदार निलेश लंके प्रतिष्ठान” यांच्या वतीने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेल्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याचं आयोजन सुद्धा करण्यात आलं होतं. यामुळे साहजिकच सध्या नगरच्या राजकीय वर्तुळात निलेश लंके हे लवकरच शरद पवार यांच्या वाटेवर दिसणार अशा चर्चा सुरू आहेत. तथापि, निलेश लंके यांनी शरद पवार यांचा फोटो एखाद्या उत्साही कार्यकर्त्यांनी बॅनरवर छापला असावा असे म्हणत या बॅनरबाजीमधून एक्झिट घेण्याचा प्रयत्न केला आहे.
एकंदरीत नगर दक्षिण लोकसभा जागेसाठी महायुतीकडून डॉक्टर सुजय विखे यांना तिकीट मिळणार हे जवळपास सुनिश्चित असल्याचे भासत असल्याने निलेश लंके हे देखील वेगळी भूमिका घेऊ शकतात आणि शरद पवार यांच्या गटात सामील होऊ शकतात अशा चर्चा सध्या नगरच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहेत. पण, शरद पवार यांच्या गटातून आमदार प्राजक्त तनपुरे यांनी देखील पक्षाने आदेश दिल्यास आपण लोकसभा लढवणार असे स्पष्ट केले आहे.
यामुळे जर शरद पवार यांच्या गटात निलेश लंके यांची इंट्री झाली तर त्यांनाही तिकीट मिळवण्यासाठी निश्चितच कसरत करावी लागणार आहे. यामुळे आता नगर दक्षिण लोकसभा जागेसाठी महायुतीमधून आणि महाविकास आघाडीकडून कोण उभे राहणार तसेच या जागेवर अपक्ष कोण उभे राहणार हे पाहणे विशेष उत्सुकतेचे राहणार आहे.