Ahmednagar News : महाविकास आघाडीच्या नेत्याच्या मनात काय आहे यापेक्षा महायुतीचे सरकार सतेवर आणण्याचा ठाम निर्धार राज्यातील जनतेन केला आहे. सतेत येण्याचे स्वप्न पाहाणाऱ्या महाविकास आघाडीचे अस्तित्व काही दिवसात संपुष्टात येईल असा दावा महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
प्रवरा उद्योग समूहाच्या गणरायाच्या विसर्जन मिरवणूकीत सहभागी झालेल्या मंत्री विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना संजय राउत यांनी उध्दव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या केलेल्या वक्तव्याची खिल्ली उडवली.
तुमच्या मनात काय आहे याला महत्व नाही.जनतेच्या मनात पुन्हा महायुती सरकार सतेवर आणण्याचा ठाम निर्धार आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांची वक्तव्य वैफल्यातून होत आहेत. आघाडीचे अस्तित्व फार दिवसाचे नाही हे सांगण्यासाठी कोणत्या ज्योतिषाची आवश्यकता नाही. मुख्यमंत्री महायुतीचा होणार असा ठाम विश्वास मंत्री विखे यांनी व्यक्त केला.
जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला कोणाचा विरोध नाही.त्यांचा तो अधिकार आहे.त्यांच्या मागण्यासह धनगर व ओबीसीच्या समाजाच्या मागण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करत असल्याची प्रतिक्रीया मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केली.
संगमनेर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याचा डॉ सुजय विखे पाटील यांनी केलेल्या निर्णयावर भाष्य करताना विखे पाटील म्हणाले की,डॉ. सुजय निर्णय घ्यायला सक्षम आहे. त्याला जो निर्णय घ्यायचा तो त्यांने घ्यावा आम्ही त्याच्या निर्णयासोबत असल्याचे त्यांनी सूचक भाष्य केले.
राज्यातील गणरायाचे आज भक्तीभावाने विसर्जन होत आहे. विनासंकट दहा दिवसाचा उत्सव पार पाडल्याचे समाधान व्यक्त करून या चैतन्यमयी उत्सवात यंदा लाडक्या बहीणींचा उत्साह आणि आनंद मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला.
प्रवरा उद्योग समूहाची गणेश विसर्जन मिरवणूकीत पाच हजार विद्यार्थ्यांचा सहभाग हा मोठा विक्रम ठरला असून डिजेमुक्त मिरवणुकी बरोबरच सहकारतून समृध्दीची संकल्पना नव्या पिढीपर्यत या उत्सवाच्या निमित्ताने पोहचली याचे समाधान असल्याचे विखे पाटील म्हणाले.