Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. आता उमेदवारी अर्ज नेण्यास सुरवात झाली असून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी २५ एप्रिल शेवटची तारीख आहे.
दरम्यान पाहिल्यादिवशी (गुरुवार) महायुतीकडून सुजय विखे पाटील यांच्यासाठी अर्ज नेण्यात आला. परंतु महाविकास आघाडीकडून पहिल्या दिवशी निलेश लंके नव्हे तर आ. तनपुरे यांचा अर्ज नेण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी २२ जणांनी ४२ तर शिर्डीसाठी १८ उमेदवारांनी ३१ अर्ज घेतले. पहिल्या दिवशी दोन्ही मतदारसंघांत एकही नामनिर्देशनपत्र दाखल झाले नाही.
पहिल्याच दिवशी सुजय विखे पाटील यांच्यासाठी अभिजित दिवटे यांनी दोन अर्ज नेले आहेत. महाविकास आघाडीचे निलेश लंके यांनी पहिल्या दिवशी अर्ज घेतला नाही. आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यासाठी राहुरी येथील अमोल दिगांबर गुलदगड यांनी चार अर्ज नेले आहेत.
तनपुरे आघाडीकडून पर्यायी अर्ज भरुन ठेवणार असल्याची माहिती मिळाली आहे. तर भाजप नेते नितीन उदमले यांच्यासाठी संजय पांडुरंग अडोळे यांनी दोन उमेदवारी अर्ज घेतले आहेत.
अशी आहे नामनिर्देशन प्रक्रिया ते चिन्हवाटपपर्यंतची प्रोसेस
नामनिर्देशनपत्र सादर करतेवेळी अनामत रक्कम जमा करावी लागणार आहे. ही रक्कम अनुसूचित जाती तथा जमातीच्या उमेदवारासाठी साडेबारा हजार रुपये असून, सामान्य वर्गातील उमेदवारासाठी पंचवीस हजार आहे.
नामनिर्देशनपत्राची छाननी दिनांक २६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेपासून सुरू होईल. नामनिर्देशन मागे घेण्याची अंतिम तारीख २९ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. नामनिर्देशन अर्जात नमूद केलेल्या पक्षानुसार चिन्हवाटप केले जाईल.
त्यासह जे उमेदवार अपक्ष उभे होतील त्यांनाही स्वतंत्र चिन्ह दिले जाईल. अपक्ष उमेदवारांसाठी १० सूचक असणे आवश्यक आहे. २९ एप्रिल रोजी तीन वाजेपर्यंत निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल.