Ahmednagar Politics : लोकसभेच्या अनुशंघाने आता सर्वच राजकीय नेतेमंडळी सरसावली आहे. नगर दक्षिणेत सध्या खा. विखे यांनी साखर डाळ वाटपातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न चालवलाय.
आता दक्षिणेत धनश्री विखे यांनी देखील संपर्क सुरु केलाय. त्या सध्या दक्षिणेत विविध गावांचा दौरा करत असून साखर वाटप करत आहेत.
मंगळवारी (दि.९) श्रीगोंदा तालुक्यातील चांभुर्डी, सारोळा सोमवंशी, कोरेगव्हाण, निंबवी, कोंडेगव्हाण व अरणगाव या गावांमध्ये धनश्री विखे व प्रतिभा पाचपुते यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले.
तसेच विखे परिवाराच्या वतीने अयोध्या येथील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने नागरिकांना चार किलो साखर व एक किलो हरभरा डाळ वाटप करण्यात आली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या,
नगर लोकसभा मतदारसंघात यापूर्वीच्या खासदारांनी केली नाहीत एवढी मोठी कामे खासदार सुजय विखे करत आहेत. सुजय विखे हे मतदारसंघाला आपले कुटुंब मानतात. ते कामात एवढे व्यस्त असतात की,
सकाळी सहा वाजता घरातून बाहेर पडतात, तर रात्री बारा वाजता दमलेल्या अवस्थेत घरी परत येतात. यावेळी धनश्री विखे यांनी खा. सुजय विखे यांचे चांगलेच गुणगान केले.
धनश्री विखेंचे जंगी स्वागत व दक्षिणेतील जनसंपर्काने भुवया उंचावल्या
धनश्री विखे यांचे दक्षिणेत विविध गावात जंगी स्वागत करण्यात आले. सारोळा सोमवंशी येथे राहुल आढाव मित्रमंडळाच्या वतीने पाच जेसीबीच्या सहाय्याने धनश्री विखे पाटील यांच्यावर फुलांची उधळण केली. फटाक्यांच्या आतषबाजीत जंगी स्वागत केले.
मोठा पुष्पहार घालण्यासाठी खास क्रेनची व्यवस्था लक्षणीय ठरली. सध्या धनश्री विखे यांच्या दक्षिणेतील जनसंपर्काने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.