Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात दिवाळी फराळ ही खारट एक संस्कृती आहे. परंतु यंदाच्या राजकीय दिवाळी फराळांनी मात्र आरोपांची आतषबाजी पाहायला मिळाली. गोड खाऊ घालून आमदार होणार झाले असते तर हलवाई देखील आमदार झाले असते असा घणाघात खा. सुजय विखे यांनी आ. नीलेश लंके यांना दिवाळी फराळावरून लगावला होता.
ही संतांच्या भूमीची शिकवण नाही…
आता याचा समाचार घेत आ. नीलेश लंके म्हणाले आहेत की,एकीकडे ‘जय श्रीराम’ म्हणायचे अन वसुबारसला शंभर बोकड कापायचे, ही संतांच्या भूमीची शिकवण नाही असे म्हणत मोठा घणाघात त्यांनी खा. विखे यांच्यावर केला आहे.
काय म्हणाले आ. नीलेश लंके
आमदार नीलेश लंके यांनी खा. सुजय विखे यांच्या अभिष्टचिंतन कार्यक्रमावर घणाघात केला आहे. ते म्हणाले आहेत की, आमदार हा एक लोकप्रतिनिधी आहे. आपल्याकडे दिवाळी सण गोडधोडाचा कार्यक्रम म्हणून पाहिला जातो. हीच आपली संस्कृती आहे.
दिवाळीनिमित्त फराळाचे ताट एकमेकांना देण्याची पद्धत आपल्या संस्कृतीत आहे. त्यामुळे मी माझ्या कुटुंबाला अर्थात मतदार संघाला दिवाळीचे गोडधोड देणारच. परंतु आमदारांना ज्यांनी हलवाई म्हटलं, यांनी दिवाळीच्या नावाखाली काय केले हे विगल सांगायला नकोय.
वसुबारसेला १०० बोकड ही कोणती संस्कृती ?
साधू संतांच्या भूमीत वसुबारसेला १०० बोकड कापून ही कोणती संस्कृती आहे असा सवाल त्यांनी केला. संतांच्या भूमीला हे मान्य होणार नाही. एका बाजूने ‘जय श्रीराम’चा नारा द्यायचा, अन् दुसऱ्या बाजूला असे बोकड कापायची मग ही धर्माची शिकवण देणाऱ्यांकडून जनतेच्या डोळ्यात धूळफेक आहे असा घणाघात त्यांनी केला.
वाद वाढण्याची शक्यता
खासदार विखे यांनी आमदारांना हलवाई असे म्हटले होते ती टीका गाजली. त्यांत राजकीय गदारोळ देखील झाला. अनेकांनी विखे यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार देखील घेतला. परंतु आता स्वतः आ. नीलेश लंके यांनी जी तिखट टीका केली आहे त्यानंतर राजकीय वाद वाढण्याची शक्यता आहे.
विखे पॅटर्नला लंके पॅटर्न शह देईल ?
सध्याचे दिवाळी फराळ, राजकीय टीका, युती, विरोधक हे सर्व आगामी लोकसभेसाठी आहे हे सर्वश्रुत आहे. दक्षिणेत आ. लंके याना खासदारकी लढवण्याची इच्छा आहे, त्यामळे त्यांनीही विखे विरोधकांची मोट बांधण्याचे काम सुरु केले आहे. त्यामुळे आता आगामी काळात विखे पॅटर्नला लंके पॅटर्न शह देईल का हे पाहणे औत्सुक्याचे आहे.