Parner News : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर होणाऱ्या या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षांचे नेते आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अलर्ट मोडवर आले आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाकडून जनसंवाद यात्रा सुरू करण्यात आली आहे. अजित पवार गटाची हीच जनसंवाद यात्रा आज पारनेर मध्ये दाखल झाली होती. याच जनसंवाद यात्रेच्या सभेत आज अजित पवारांनी नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
खरे तर गेल्या लोकसभा निवडणुकीत निलेश लंके यांना चांगले यश मिळाले होते. लंके यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात मोठा उलटफेर केला आणि सुजय विखे पाटील यांना मोठ्या मताधिक्याने पराभूत केले.
यामुळे महाविकास आघाडी मधील नगर जिल्ह्यातील जागावाटपात प्रामुख्याने पारनेरच्या जागावाटपात लंके यांचा वरचष्मा राहणार आहे. पारनेरच्या जागेवर लंके यांच्या पसंतीचाच उमेदवार राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पारनेर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी कडून यावेळी निलेश लंके यांच्या धर्मपत्नी राणी लंके यांना उमेदवारी मिळू शकते.
दुसरीकडे महायुतीकडून ही जागा अजित पवार यांच्या गटाला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर पारनेर मध्ये अजित पवार गटाची जनसंवाद यात्रा आज दाखल झाली होती. यावेळी अजित पवारांनी सुपे एमआयडीसीवरून निलेश लंके यांना टार्गेट केले आहे.
पवार यांनी आपल्या भाषणात असे सांगितले की, ‘पारनेरच्या सुपे एमआयडीसी मध्ये गेल्या काही वर्षापासून मोठी दहशत आणि दादागिरी होत असल्याचे माझ्या कानावर आले आहे. या विरोधात अनेक लोक तक्रारी सुद्धा करीत आहेत.
सुपा एमआयडीसी मध्ये कार्यरत असणाऱ्या उद्योगपतींनीही याबाबत माझ्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. वाळू सिमेंट खडी अमुकचं माणसाकडून घ्यावी, असा त्याचा आग्रह असतो. तिकडे आमच्याकडेही औद्योगिक वसाहती आहेत, पण आम्ही तिथे कुठल्याही प्रकारची दादागिरी करीत नाही.
म्हणून आमच्याकडे उद्योगधंदे सुरळीत चालतात. पण मी त्याच्या गुंडगिरी, दादागिरीवर लवकरच तोडगा काढतो,’ असे म्हणतं अजित पवार यांनी नाव न घेता निलेश लंके यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे.
यावेळी पवार यांनी निलेश लंके यांच्या समावेत असणाऱ्या लोकांनी, चांडाळ चौकटीने तालुक्याचे वाटोळे केले आहे असा घणाघात केलाय. पुढे बोलताना अजित पवार यांनी, निलेश आता खासदार आहे. आता त्याला त्याच्याच घरी आमदारकी सुद्धा ठेवायची आहे.
पारनेरकरांनो जर त्याच्याच घरात दोन्ही पदे गेली तर तुम्हाला कुणी वाली राहणार नाही. म्हणून तुम्ही भावनिक होऊ नका, असे म्हणतं अजित पवारांनी निलेश लंके यांच्यावर चौफेर फटकेबाजी केलीये. म्हणून सध्या त्यांच्या या भाषणाची पारनेरमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.