Parner Vidhansabha Nivdnuk : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात चांगले यश मिळाले होते. म्हणून, आता महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकांसाठी कंबर कसली आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये सध्या जागा वाटपावर चर्चेचे सत्र सुरू आहे. येत्या काही दिवसांनी महाविकास आघाडी मधील जागावाटप अंतिम होणार आहे.
त्या आधीच मात्र पारनेर विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापू लागले आहे. महाविकास आघाडीत येथून इच्छुक उमेदवारांची मोठी भाऊ गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख आणि कट्टर शिवसैनिक संदेश कार्ले यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे.
कार्ले हे येथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र ही जागा महाविकास आघाडी शरद पवार गटाला सुटण्याची दाट शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत येथून निलेश लंके यांनी विजय मिळवला होता. आता निलेश लंके हे नगर दक्षिणचे खासदार आहेत. पण, ही जागा शरद पवार यांच्या वाट्यालाच येणार असे दिसते.
महत्त्वाचे म्हणजे या जागेवर खासदार निलेश लंके जो उमेदवार देतील तोच उमेदवार फायनल करू असे विधान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी केले होते. यामुळे येथून निलेश लंके यांच्या मर्जीतीलच उमेदवार दिसू शकतो अशा चर्चा सुरू आहेत.
येथून निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके या आगामी निवडणुकीत उभ्या राहणार असे बोलले जात आहे. दरम्यान पारनेर मधून निवडणूक लढवू इच्छिणारे ठाकरे गटातील कार्ले आता राजकीय फिल्डिंग लावताना दिसत आहेत. यासाठी त्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे.
पारनेरची जागा ही शरद पवारांकडे आहे यामुळे कार्ले यांनी पवार साहेबांची भेट घेतली. यावेळी ‘शरद पवार यांनी कार्ले यांच्या धाडसाचं कौतुक केल. राज्यातील प्रत्येक विधानसभेच्या जागेचा विचार महाविकास आघाडी म्हणून होत आहे.
तुम्ही फक्त काम करत राहा, सत्तेत बसायचे आहे. सगळी कामे नियोजनाने मार्गी लावली जात आहेत. सत्ता आणू, नंतर सर्व काही पाहू’, अशा सूचना यावेळी पवार साहेबांनी दिल्या असल्याची माहिती कार्ले यांनी दिली.
एकंदरीत, राणी लंके यांना उमेदवारी मिळणार अशा चर्चा असतानाच कार्ले यांनी पवार साहेबांची भेट घेतलीय यामुळे या भेटीनंतर पारनेर विधानसभा मतदारसंघाचे समीकरण बदलणार का ? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.