PM Narendra Modi News : लोकसभा निवडणुकीनंतर आता संपूर्ण महाराष्ट्राला वेध लागले आहे ते विधानसभा निवडणुकीचे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत मोठा उलटफेअर झाला. म्हणून विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. बंद दाराआड जागा वाटपावरून देखील दोन्ही गटांमध्ये जोरदार खलबत सुरू असल्याचे समजत आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील सक्रिय झाले आहेत. ते लवकरच दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध विकास कामांचा शुभारंभ करून विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकणार आहेत. तसेच काही महत्त्वाच्या कार्यक्रमांना देखील पीएम मोदी हजेरी लावणार आहेत.
यासोबतच महायुतीच्या घटक पक्षातील नेत्यांसमवेत महत्त्वाच्या गाठीभेटी देखील होणार आहेत. पुढील महिन्यात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील असे वृत्त समोर आले आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील असेच संकेत दिले आहेत.
यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पुणे दौरा खूपच महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यातून पीएम मोदी विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकणार अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
यामुळे मोदी यांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असून महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडी मधील नेते मंडळी देखील या दौऱ्याकडे विशेष लक्ष ठेवून आहे. पीएम मोदी 26 आणि 27 सप्टेंबरला पुण्यात राहणार आहेत. अशा परिस्थितीत आता आपण पीएम मोदी यांचा पुणे दौरा नेमका कसा आहे, यावेळी मोदी पुण्याला काय भेट देणार या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
कसा असणार पीएम मोदींचा पुणे दौरा
26 सप्टेंबरला पीएम मोदी पुण्यात येतील आणि याच दिवशी सिव्हिल कोर्ट अर्थात शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट या पुण्यातील पहिल्या भूमिगत मेट्रो मार्गाचे उद्घाटन करणार आहेत. यासोबतच ते स्वारगेट ते कात्रज या विस्तारित मेट्रो मार्गाच्या कामाचे भूमिपूजन सुद्धा करणार आहेत.
या विकास कामांच्या शुभारंभानंतर मोदी शिक्षक प्रसारक मंडळी संस्थेचे स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर सहभागी होणार आहेत. 26 तारखेला मोदी पुण्यातच मुक्कामी राहतील.
मग ते 27 सप्टेंबरला विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील विकसित भारत या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. याचं दिवशी दुपारी बारा ते अडीच दरम्यानचा काळ हा महत्त्वाच्या गाठीभेटींसाठी आरक्षित आहे. या काळात ते आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातील महायुतीच्या नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करू शकतात अशी माहिती काही मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.
या दिवशी सायंकाळच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी तुकाराम जगन्नाथ कॉलेज खडकी येथील विकसित भारतच्या कार्यक्रमाला हजेरी लावतील. हा कार्यक्रम झाल्यानंतर ते छत्रपती संभाजीनगरकडे रवाना होणार अशी माहिती हाती आली आहे आहे.