Praniti Shinde : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडावा. राष्ट्रवादी हा मतदारसंघ लढवू शकतो, असे म्हटले होते. यावरून आता काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये वाद पेटला आहे. यावर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी आम्ही सोलापूर सोडला, तर आम्हाला बारामती मतदारसंघ सोडणार का, असा सवाल केला होता.
नंतर राष्ट्रवादीकडून महेश कोठे यांनी बारामतीकरांना आव्हान देणं म्हणजे सुशीलकुमार शिंदे यांना अडचणीत आणण्यासारखे आहे, असे उत्तर दिले होते. यामध्ये आता काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी रोहित पवार यांना जोरदार उत्तर दिले आहे.
प्रणिती शिंदे यांनी कोण रोहित पवार? असा सवाल करत पोरकटपणा असतो काही लोकांमध्ये. आमदार म्हणून त्यांची पहिलीच टर्म आहे. त्यांना थोडे दिवस दिले की मॅच्युरिटी येईल, असे म्हटले आहे. यामुळे आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सोलापूर लोकसभा मतदारसंघ कोणी लढवयचा, याबाबत महाविकास आघाडीची बैठक होईल, असा माझा अंदाज आहे. यामध्ये ही जागा काँग्रेसकडेच राहिल की राष्ट्रवादीकडे हे या बैठकीत ठरेल. असे वक्तव्य रोहित पवार यांनी केले होते. यावर काँग्रेस आता आक्रमक झाला आहे.
या जागेवर काँग्रेस नेते माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे हे लढत असतात. यामुळे सोलापुरात राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस असे वाकयुद्ध रंगले आहे. आता रोहित पवार काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, रोहित पवार यांनी राष्ट्रवादीकडून या मतदारसंघावर दावा करताच काँग्रेस नेते त्यांच्यावर तुटून पडले आहेत. याठिकाणी 2014 पासून भाजप उमेदवार निवडून येत आहे. यामुळे राष्ट्रवादी यावर दावा करू शकतो.