Pune : पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवडमधील पोटनिवडणुकीसाठी आज भाजप उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यावेळी दिवंगत आमदार लक्ष्मण याच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी चिंचवड विधानसभा मतदार संघातून भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला.
असे असताना लगेच लक्ष्मण जगतापांचे लहान बंधू शंकर जगतापांनी देखील अर्ज दाखल केला. यामुळे याची चर्चा रंगली. मात्र भाजपकडून खबरदारी म्हणून हा डमी अर्ज दाखल केला असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, अश्विनी जगतापांचा अर्ज छाननीत बाद झाला तर ऐनवेळी कोणती अडचण निर्माण होऊ नये. यासाठी हा अर्ज भरला असू शकतो. शंकर जगतापांनी खबदारी म्हणून अर्ज भरुन ठेवला आहे, असेही स्पष्ट केले. यानिमित्ताने शहरात मात्र वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.
लक्ष्मण जगताप असा डमी अर्ज भरुन ठेवायचे. आजदेखील मी खबरदारी म्हणूनच डमी अर्ज भरून ठेवला आहे. अनेकदा तांत्रिक अडचणी निर्माण होतात. त्यावेळी कोणतीही गफलत होऊ नये, यासाठी मी आज अर्ज भरला आहे, शंकर जगताप म्हणाले.
दरम्यान, उमेदवारी अश्विनी जगताप यांना दिल्यावर शंकर जगताप काही काळ माध्यमांसमोर आले नव्हते. त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले होते.