Radhakrishan Vikhe Patil : महाराष्ट्रात येत्या काही दिवसांनी विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी देशात लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यात. आता राज्यात विधानसभेच्या निवडणुका सुरू होणार आहेत. लवकरच भारतीय निवडणूक आयोग निवडणूकांच्या तारखा जाहीर करण्याची शक्यता आहे. दरम्यान निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याआधीच राजकीय नेत्यांनी आणि राजकीय पक्षांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले आहे. महाविकास आघाडी आणि महायुती मधील राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. राधाकृष्ण विखे पाटील देखील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सक्रिय झाले असून ते गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बाळासाहेब थोरात यांच्यावर हल्ला चढवत आहेत.
खरंतर लोकसभा निवडणुकीत मंत्री विखे यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांचा पराभव झाला. या पराभवामागे बाळासाहेब थोरात यांचा समावेश होताच. यामुळे याच पराभवाचा वचपा करण्यासाठी आता मंत्री विखे यांनी कंबर कसली आहे. ते गेल्या काही दिवसांपासून थोरात यांच्यावर जोरदार टिका करत आहेत.
दरम्यान राहता तालुक्यातील लोणी या ठिकाणी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. यावेळी मंत्री विखे पाटील यांनी उपस्थितांना भाषणातून संबोधित केले. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी थोरात यांचा समाचार घेतला.
मंत्री विखे पाटील यांनी असे म्हटले की, “निळवंडे धरणावरून आमची बदनामी करण्याचा प्रयत्न शेजारच्या मित्रानं केला आहे. पण धरणातील पाणी काढण्याचं पुण्य विखे कुटुंबियांना मिळालं. स्वतःला जलनायक म्हणून घेणाऱ्यांनीच समन्यायी पाणी वाटपाचे भूत जिल्ह्याच्या मानगुटीवर बसवून खलनायकाची भूमिका बजावली आहे.”
पुढे बोलताना विखे पाटील यांनी, ते सात वर्षे महसूलमंत्री राहिलेत पण जिल्ह्याच्या हितासाठी एकही निर्णय त्यांना घेता आला नाही. जिल्ह्याच्या हितासाठी मी केलेली 50 कामे दाखवतो, तुम्ही केलेले एक तरी काम दाखवा, असं आव्हान थोरात यांना केले. खरे तर थोरात आणि विखे यांच्यातील राजकीय वैर जिल्ह्याला काही वेगळे नाही.
बरं या दोन घराण्यांमधील हे राजकीय वैर आज पासून सुरू आहे का? तर, नाही. मग अचानक मंत्री विखे हे थोरात यांच्यावर अधिक आक्रमक का होत आहेत. त्याच्यामागे पण एक मजेशीर कारण आहे. ते म्हणजे मंत्री विखे यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील संगमनेर मधून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.
सुजय विखे पाटील यांनी थोरात यांच्या गावात जाऊन त्यांना आव्हान देखील दिले आहे. मंत्री विखे यांनी देखील सुजय जो निर्णय घेईल त्या निर्णया मागे आपण ठाम उभे राहू असे म्हणत माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्याशी सहमती दर्शवली आहे. अर्थातच यंदाची संगमनेर मधील निवडणूक काँग्रेसचे बाळासाहेब थोरात विरुद्ध भारतीय जनता पक्षाचे युवा नेतृत्व सुजय विखे पाटील यांच्यात होऊ शकते.
आतापर्यंत थोरात यांना संगमनेरचा गड राखण्यासाठी फारशी मेहनत घ्यावी लागत नव्हती. मात्र जर सुजय दादांनी येथून निवडणुकीचा फॉर्म भरला तर नक्कीच थोरात यांना संगमनेरचा गड राखण्यासाठी अधिकचा फौज फाटा तैनात करावा लागणार आहे.
यामुळे जर सुजय दादा येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर यंदाची संगमनेर मधील निवडणूक महाराष्ट्रात सर्वाधिक हाय व्होल्टेज ड्रामा असणारी निवडणूक ठरणार आहे. यामुळे सुजय विखे पाटील येथून निवडणूक लढवणार का, थोरात विरुद्ध विखे असा निवडणुकीचा आखाडा सजणार का ? या सर्व गोष्टी पाहण्यासारख्या ठरणार आहेत.