राजकारण

निलेश लंके यांच्याबाबत राधाकृष्ण विखे पाटील स्पष्टच बोललेत; म्हटलेत की, निवडणूक लढवणे हे…

Radhakrishna Vikhe Patil On Nilesh Lanke : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभेच्या निवडणुकींचे पडसाद उमटू लागले आहेत. राजकीय पक्षांच्या माध्यमातून आगामी लोकसभेसाठी मोर्चे बांधणी सुरू करण्यात आली आहे. राजकीय नेते देखील आता आगामी निवडणुकीसाठी जय्यत तयारी करत आहेत. अहमदनगर जिल्ह्यात देखील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले पाहायला मिळत आहे.

जिल्ह्यात दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. एक शिर्डी लोकसभा मतदारसंघ आणि दुसरा म्हणजे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ. महायुतीकडून शिर्डीच्या जागेवर एकनाथ शिंदे यांच्या गटाला तिकीट मिळणार अशी आशा आहे. दुसरीकडे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघावर भाजपाचा उमेदवार उभा केला जाणार आहे.

नगदक्षिणेतून विद्यमान खासदार सुजय विखे यांना पुन्हा उमेदवारी मिळू शकते, असे चित्र सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे. मात्र नगर दक्षिणमधून महायुतीमध्ये समाविष्ट असलेल्या अजित दादा यांच्या गटातील पारनेरचे आमदार निलेश लंके हेदेखील निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. निलेश लंके यांच्या माध्यमातून तसे संकेत देखील दिले जात आहेत.

त्यांनी नगर शहरात नुकतेच शिवपुत्र संभाजी हे महानाट्य आयोजित केले होते. या महानाट्याला महायुतीमधील तसेच महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. बीजेपीचे विधान परिषद आमदार राम शिंदे आणि युवा नेते विवेक कोल्हे यांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

यावेळी विवेक कोल्हे यांनी स्व-पक्षातील विखे पिता पुत्रांवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी विखे यांचे नाव न घेता त्यांना नगर जिल्ह्याला लागलेला कॅन्सर संबोधले. तसेच हा कॅन्सर लंके यांनी बरा करावा, असे म्हटले. दुसरीकडे आमदार राम शिंदे यांनी निलेश लंके यांच्यावर स्तुतीसुमने उधळलीत.

विशेष बाब अशी की, निलेश लंके यांना शरद पवार यांच्या गटात येण्याची आणि नगर दक्षिण मधून निवडणूक लढवण्याची खुली ऑफर देखील देण्यात आली. शरद पवार यांच्या गटातील खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी म्हटले की, “शरदचंद्र पवार साहेबांकडे संपूर्ण महाराष्ट्र संघर्ष योद्धा म्हणून बघतोय.

महाराष्ट्राच्या आणि त्यांच्या स्वाभिमानासाठी आम्ही मावळे लढतोय. लोकनेत्यांच्या वाढदिवसासाठी गिफ्ट द्यायचे असते. मी मागतोय, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी दिल्लीच्या तक्ताला घाम फोडणारा असा जर नेता आमच्या खांद्याला खांदा लावून मिळाला तर…, जबाबदारी तुमची आहे आणि लोकनेत्याने यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा.

आई जगदंबेकडे हीच प्रार्थना आहे की, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी दक्षिणेत वाजवावी.” एकंदरीत खासदार कोल्हे यांनी निलेश लंके यांना नगर दक्षिणेतून शरद पवार यांच्या गटाकडून उभे राहण्याची खुली ऑफर यानिमित्ताने दिली आहे.

दरम्यान, निलेश लंके यांच्या विषयी नगर दक्षिणेचे विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे वडील आणि महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतीच एक प्रतिक्रिया दिली आहे. निलेश लंके हे शरद पवार यांच्या संपर्कात आहेत आणि ते सुजय विखे यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे, असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारला.

यावर प्रतिक्रिया देताना, निवडणूक लढवण्याचा प्रत्येकालाच अधिकार आहे. त्यामुळे निलेश लंके हे निवडणूक लढवत असतील तर आश्चर्य वाटण्याचे काही कारण नाही, असे म्हटले आहे. विखे पाटील हे अकोल्यात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts