Rahata Shirdi Vidhansabha Matdarsangh : महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक नुकतीच पार पडली आहे. काल, 20 नोव्हेंबरला विधानसभेची निवडणूक झालीये. आता येत्या २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. मतमोजणी झाल्यानंतरच महाराष्ट्रात कोणाचे सरकार येणार हे क्लिअर होणार आहे. राज्यात महायुतीचे सरकार येणार की महाविकास आघाडीचे हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
खरे तर, नुकत्याच काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट प्रणित महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले होते. पण महायुती मध्ये समाविष्ट असणाऱ्या भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा फटका बसला.
महाराष्ट्रातील दोन प्रमुख पक्षांमध्ये अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसला होता. यामुळे विधानसभा निवडणुकीत नेमके काय होणार? कोणाची सत्ता येणार याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. विविध एक्झिट पोल मध्ये वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत.
काही एक्झिट पोल महायुतीला बहुमत दाखवत आहे तर काही महाविकास आघाडीला बहुमत देत आहेत. यामुळे बहुमताच्या आकड्याजवळ कोणती आघाडी पोहोचते हे पाहण्यासारखे ठरेल. महाराष्ट्रात सत्ता स्थापित करण्यासाठी 145 आमदारांचे संख्याबळ लागते. यामुळे या मॅजिकल फिगर पर्यंत कोणती आघाडी पोहोचणार हे 23 तारखेलाच क्लिअर होणार आहे.
तत्पूर्वी मात्र अहिल्या नगर जिल्ह्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघात कोण विजयी होणार याबाबत एक्झिट पोल मध्ये मोठा दावा करण्यात आला आहे. सकाळच्या एक्झिट पोल नुसार राहता शिर्डी विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा महायुतीचे अधिकृत उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील हे विजयी होणार आहेत.
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, अहिल्यानगरचे पालकमंत्री, राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा शिर्डी हा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघात विखे पाटील यांचे राजकीय वजन फारच अधिक असून ते गेल्या सात निवडणुकांमध्ये अपराजित राहिले आहेत.
महत्त्वाचे म्हणजे या निवडणुकीत देखील राधाकृष्ण विखे पाटील हेच विजयी होणार असा दावा एक्झिट पोल मध्ये करण्यात आला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांना काँग्रेसच्या प्रभावती घोगरे यांच्याकडून आव्हान उभे करण्यात आले आहे. पण, घोगरे विखे पाटील यांच्या बालेकिल्ल्यात त्यांना रोखण्यात असमर्थ ठरत असल्याचा अंदाज एक्झिट पोल मधून समोर येतोय.
सकाळच्या एक्झिट पोलप्रमाणेचं प्रजातंत्र या संस्थेच्या एक्झिट पोल मध्ये देखील राहाता शिर्डी विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा राधाकृष्ण विखे पाटील हेच विजयी होणार असा दावा करण्यात आला आहे. पण विखे पाटील यांच्या बालेकिल्ल्यात थोरात पुरस्कृत घोगरे ताई काही उलटफेर करणार की पुन्हा एकदा राधाकृष्ण विखे पाटील आपला बालेकिल्ला शाबूत राखणार हे सारं काही 23 तारखेला स्पष्ट होईल.