Rahuri Vidhansabha : विधानसभा निवडणुकांसाठी येत्या 20 तारखेला मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्यानंतर तीन दिवसांनी म्हणजेच 23 तारखेला मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे. अर्थातच निवडणुक आता जवळपास अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या काही दिवसांनी प्रचाराचा झंझावात शांत होणार आहे.
या आधीच मात्र उमेदवारांच्या माध्यमातून जोरदार वातावरण निर्मिती केली जात आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीचे फायर ब्रँड नेते आपापल्या उमेदवारांसाठी मत मागत आहेत. यासाठी मोठमोठ्या सभांचे आयोजन केले जात आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघात देखील महायुती आणि महाविकास आघाडी कडून जोरदार तयारी सुरू आहे.
येथे महाविकास आघाडी कडून शरद पवार गटाचे विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे अन महायुतीकडून भारतीय जनता पक्षाचे शिवाजीराव कर्डिले हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार तनपुरे यांच्यासाठी आघाडीतील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी प्रचार सभा घेतली आहे.
काल, नगर तालुक्यातील जेऊर बाईजाबाई येथे महाविकास आघाडी तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली. या प्रचार सभेला नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके हजर होते.
यावेळी खासदार लंके यांनी प्रचार सभेला संबोधित करताना, ‘शिवाजी कर्डिले हे जर निवडून आले तर ते राहुरीचा बिहार करण्यास देखील मागे-पुढे बघणार नाहीत. हे दिवसाढवळ्या आपल्याला हिंडून सुद्धा देणार नाहीत. ही जर दहशत मोडून काढायची असेल तर तनपुरे यांना साथ द्या. सत्तेचा वापर त्यांनी विकासासाठीच केला आहे.
ऊर्जाखात्याच्या माध्यमातून मतदारसंघांमध्येच नव्हे तर राज्यामध्ये नावलौकिक मिळवलाय. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे मोठे काम केले. आता कर्डिले यांच्याबरोबर फिरणाऱ्यांचे मला फोन येत आहेत. दबावामुळे आम्हाला त्यांच्यासोबत प्रचार करावा लागत आहे, असं ते सांगतात.
तुम्ही राहुरीकर आमदार नव्हे तर नामदार निवडून देणार आहात. प्राजक्त दादांना मतदान म्हणजे दहशत संपविण्यासाठी मतदान द्यायचे आहे. मला जसे मताधिक्य दिले तसे आता दादांना मताधिक्य द्यायची जबाबदारी जेऊरकरांची आहे,’ असं म्हणतं निलेश लंके यांनी कर्डिले यांच्यावर निशाणा साधला आणि तनपुरे यांना प्रचंड मताधिक्यांनी विजयी करण्याचे आवाहन केले.
ते म्हणालेत, विद्यमान आ. प्राजक्त तनपुरे विकासाचा झंझावात आहेत. तो बघता यंदा गुलाल हा आपलाच आहे. मागील 5 वर्षांत विकासाची कामे करणाऱ्याला आपल्याला पुन्हा निवडून द्यायचे आहे. समोरच्या उमेदवाराला कायमचेच घरी बसवायचे आहे.
मतदार संघातील दहशतीला गाडून कामदार, ऊर्जावान आमदाराला आता आपल्याला नामदार करायचे आहे, असं वक्तव्य नगर शहर विधानसभा मतदारसंघातील खासदार निलेश लंके यांनी केले. निलेश लंके यांचे वक्तव्य सध्या राहुरी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात चर्चेले जात आहे. तनपुरे विजयी झाल्यास मंत्री होणार, अशा चर्चा पुन्हा एकदा मतदार संघात सुरू झाल्या आहेत.
खरे तर स्वतः शरद पवार यांनी आमदार तनपुरे यांच्या कामाची स्तुती करत त्यांना मंत्री करू असे संकेत दिले होते. तनपुरे यांच्या प्रचारार्थ आयोजित एका जाहीर सभेत शरद पवार यांनी तसे संकेत दिले होते. दरम्यान आता पवार साहेबांनंतर लंके यांनी देखील तनपुरे यांना मंत्री केले जाईल असे म्हटले आहे.