Rahuri Vidhansabha : भारतीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. काल निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या असून कालपासूनचं राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. तथापि अद्याप महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाले नसल्याची वास्तविकता आहे.
मात्र लवकरच महाविकास आघाडी आणि महायुती आपले उमेदवार जाहीर करणार आहेत. अशातच, महायुतीची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. अहिल्या नगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघात महायुतीला प्रामुख्याने भाजपाला मोठा फटका बसला असल्याचे दिसते.
राहुरी तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकला आहे. यामुळे तालुक्यातील पक्षाची ताकद कमी झाली असून नुकतेच मंत्री विखे पाटील यांचे निकटवर्तीय, तालुका भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा तालुका विकास महामंडळाचे अध्यक्ष रावसाहेब उर्फ चाचा तनपुरे यांनी भारतीय जनता पक्षाची साथ सोडली असून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
चाचा तनपुरे यांचे भाचे, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष धीरज पानसंबळ यांनी देखील भाजपाला जय महाराष्ट्र करत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला आहे. यामुळे भाजपाची तालुक्यातील ताकद कमी झाली असून शरद पवार गटातील विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांची ताकद वाढली आहे.
खरे तर गेल्या तीन महिन्यांच्या आत तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे जवळपास दीड डझनहुन अधिक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षाला राम राम ठोकला आहे. ऐन विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुरी तालुक्यात भाजपामधून आउटगोइंग सुरू झाल्याने पक्षाची चिंता वाढत आहे.
यामुळे माजी आमदार शिवाजी कर्डिलेसह संपूर्ण भारतीय जनता पक्षाच्या खेम्यात अस्वस्थता पसरलेली पाहायला मिळते. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत आहिल्या नगर जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष प्रणित महायुतीला मोठा फटका बसला आहे.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत लोकसभेसारखा पराभव होऊ नये यासाठी महायुती जोरदार तयारी करत आहे. तर दुसरीकडे आता महायुती मधील प्रमुख पक्ष भाजपामधून मोठ्या प्रमाणात आउटगोइंग सुरू झाली असून यामुळे भारतीय जनता पक्ष अडचणीत सापडला आहे.
माजी आमदार शिवाजी कर्डिले हे देखील या आउटगोइंग मुळे चिंतेत आले आहेत. खरे तर अजून राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारांची घोषणा झालेली नाही. मात्र या जागेवर महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे प्राजक्त तनपुरे हे उभे राहतील आणि त्यांच्या विरोधात माजी आमदार अन मंत्री शिवाजी कर्डिले यांना उभे केले जाऊ शकते असा अंदाज आहे.
अशा या परिस्थितीत भारतीय जनता पक्षातून राहुरी तालुक्यातील अनेक ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी काढता पाय घेतला असल्याने पक्षाची तालुक्यातील ताकद कमी झाली असून याचा फायदा हा विद्यमान आमदारांना होऊ शकतो असे राजकारणातील तज्ञांचे म्हणणे आहे.
गत काही महिन्यांच्या काळात भारतीय जनता पक्षामधून अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शरद पवार गटात तसेच महाविकास आघाडीतील दुसऱ्या पक्षांमध्ये प्रवेश घेतला असल्याने विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांची ताकद वाढली असून त्यांचा विजयाचा मार्ग सोपा होत असल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.