राजकारण

राहुरीत शेवटच्या टप्प्यात समीकरणे फिरलीत ! भाजपाला बसला मोठा धक्का; तनपुरे यांच्यावर विश्वास दाखवत अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीत (शरद पवार) दाखल

Rahuri Vidhansabha News : राहुरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. 2019 प्रमाणेच यंदाही राहुरी मध्ये महायुतीकडून भारतीय जनता पक्षाचे शिवाजीराव कर्डिले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यात लढत होत आहे.

शिवाजीराव कर्डिले आणि विद्यमान आमदार तनपुरे यांच्या माध्यमातून सध्या मतदारसंघात जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे. काल तनपुरे यांच्यासाठी शरद पवार यांनी मोठी सभा घेतली. फक्त सभाच घेतली नाही तर या सभेत राहुरीकरांना एक मोठे आवाहनही केले.

तालुक्यातील वांबोरी येथे तनपुरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना शरद पवार यांनी तनपुरे यांच्या कार्याचा गौरव केला अन त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपदाचीही ऑफर दिली. ते म्हणाले महाविकास आघाडी सरकारमध्ये आमदार प्राजक्त तनपुरे यांना राज्यमंत्री पद दिले.

6 खात्यांचा कारभार सांभाळताना त्यांनी केलेली विकासकामे पाहता माझ्या विश्वासाचे सार्थक झाले. आता राहुरीकरांनी त्यांना यंदाच्या विधानसभेतही आमदार म्हणून पाठवावे, त्यांना कॅबिनेट मंत्रिमंडळात स्थान देण्याची जबाबदारी मी घेतो, असे मोठे विधान शरद पवार यांनी केले.

शरद पवार यांच्या या विधानामुळे मतदार संघात तनपुरे यांच्यासाठी परिस्थिती आणखी पूरक बनू शकते, असे मत काही राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केले जात आहे. दरम्यान विद्यमान आमदार तनपुरे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत सध्या राष्ट्रवादीमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. मतदार संघातील भारतीय जनता पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश घेतला आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, डिग्रस सेवा संस्थेचे संचालक राहुल भिंगारदे, माजी उपसरपंच राजेंद्र आघाव, खडांबे बु. येथील माजी सरपंच यशवंत ताकटे, ग्रामपंचायत सदस्य राहुल पवार, रोहित पवार, किरण कल्हापूरे, अफजल पठाण यांसह धारवाडी (ता.पाथर्डी) येथील माजी सरपंच युवा नेते बापूसाहेब गोरे, नवनाथ रणसिंग यांनी आ. तनपुरे यांना पाठबळ देण्याचा निर्णय घेतला.

यासंदर्भात बोलताना युवा नेते हर्ष तनपुरे यांनी वाढत्या प्रवेशाने विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया दिली. खरे तर मतदानाचा दिवस आता जवळ येत आहे. अशा परिस्थितीत या शेवटच्या घटकात भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी तनपुरे यांना पाठिंबा दिला असल्याने मतदार संघात त्यांची ताकद आणखी वाढली आहे.

तसेच, निवडणुकीच्या काळात झालेला हा पक्षप्रवेश महायुतीच्या उमेदवारासाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. शरद पवार यांच्या विधानामुळे आणि पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशामुळे तनपुरे हे सध्या राहुरी मधून आघाडीवर आहेत.

म्हणून 23 तारखेला राहुरी चा निकाल काय लागणार हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे. तनपुरे यांनी कर्डिले यांच्याकडून हिसकावलेली जागा कायम ठेवण्यात त्यांना यश येणार का ? की कर्डिले कमबॅक करणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts