Raj thackeray : राज्यात सध्या कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीची चर्चा सुरू आहे. सर्व पक्ष या निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत आहेत. तसेच ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी काहीजण इच्छुक आहेत. यासाठी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीला पत्र लिहिले आहे.
यामध्ये त्यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे. राज ठाकरे यांनी अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीची आठवणही महाविकास आघाडीला करून दिली आहे. राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र विधानसभेच्या 2 आमदारांच नुकतंच दुःखद निधन झालं. ह्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिडणूका होत आहेत.
मी अगदी सुरुवातीपासून ह्या मताचा आहे की, जेंव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होत तेंव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी. कारण मुळात जसा त्या विधानसभेतील कौल लोकप्रतिनिधीला असतो, तसाच कौल त्याच्या पक्षाला देखील असतो.
अनेकदा त्या पोटनिवडणुकीत उमेदवार हा मृत व्यक्तीच्या घरातील असतो, अशावेळेस पक्षाने जर मृत व्यक्तीच्या घरातील उमेदवार दिला असेल तर, त्या उमेदवाराला बिनविरोध निवडून देणं ही एक प्रकारे, राजकीय संस्कृतीने त्या निधन झालेल्या व्यक्तीला श्रद्धांजलीच ठरणार नाही का? असे त्यांनी पत्रातून म्हटले आहे.
यामुळे आता राज ठाकरे यांचा सल्ला महाविकास आघाडी मानणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. तसेच इतर पक्ष दोन दिवसांमध्ये उमेदवार जाहीर करतील.
ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील शरद पवारांना फोन केल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे आता येणाऱ्या दोन दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होणार आहे.