Raj Thackeray : शिवाजी पार्कवर आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुढी पाडवा मेळाव्यानिमित्त जाहीर सभा होत आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांमध्ये मोठे उलटफेर झाले आहेत. त्यातच सत्तासंघर्षाची सुप्रीम कोर्टातली सुनावणीही संपली आहे, ज्याचा निकाल कधीही येऊ शकतो.
असे असताना सभेपुर्वी शिवाजी पार्क परिसरात मनसेकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री राज ठाकरे अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. शिवसेना भवनासमोर बॅनर लावून मनसेने ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यामुळे राज ठाकरे या संपूर्ण राजकारणाबाबत कोणती भूमिका घेणार आणि खास त्यांच्या शैलीत कोणावर घणाघात करणार? याची उत्सुकता निर्माण झाली आहे. तसेच मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर काही दिवसांपूर्वी हल्ला झाला होता.
यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, त्यादिवशी घटना घडल्यानंतर मी काही बोललो नाही. मला अनेकांनी विचारलं तुम्हाला काय वाटतं? कोणी केलं असेल. एक निश्चित सांगतो, ज्याने हल्ला केला त्याला आधी कळेल आणि मग सगळ्यांना कळेल. असा इशाराच त्यांनी दिला होता.
कोणाचे वाभाडे काढायचे, कोणावर काय बोलायचं हे, हे सगळं मी गुढीपाडव्याच्या सभेत बोलणार, असेही त्यांनी सांगितले होते. यामुळे या सभेत राज ठाकरे काय बोलतील आता याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.