Ahmednagar Politics : शेतीमहामंडळाची असलेली जमीन औद्योगिक वसाहतीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या वसाहतीमध्ये येणाऱ्या उद्योग व्यवसायामुळे राहाता, कोपरगावसह आसपासच्या तालुक्यातील युवक, युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे.
अनेक वर्षे या जिल्ह्यात महसूलमंत्री पद होते तरी खंडकरी शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला नाही ही खेदाची बाब असल्याचे मत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.
कोपरगावातील संवत्सर येथे उभारण्यात येणाऱ्या ग्रामीण रुग्णालयाचे भूमिपूजन तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत संवत्सर-कान्हेगाव-वारी या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी आयोजित सभेत ते बोलत होते. आमदार आशुतोष काळे, माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, भाजपाचे नेते रवींद्र बोरावके, डॉ. गोरक्षनाथ बर्डे, राजेंद्र जाधव, उपविभागीय अधिकारी माणिकराव आहेर,]
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे आदींची प्रमुख उपस्थिती होती. दूध महासंघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
कृषी विभागाच्या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना ट्रॅक्टर, पशुसंवर्धन विभागाच्या योजनेंतर्गत गाय गटाच्या धनादेशाचे तसेच दिव्यांग लाभार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले.
उपसरपंच विवेक परजणे यांनी आभार मानले.
आवर्तने मिळण्यासाठीही लक्ष घालावे -काळे
यावेळी आमदार आशुतोष काळे म्हणाले, पालकमंत्री विखे पाटील यांनी खंडाकऱ्यांच्या जमिनी २ मधून १ मध्ये आणून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. सावळीविहीर परिसरात औद्योगिक वसाहत निर्माण करण्यासाठी घेतलेला पुढाकार या भागातील बेरोजगार तरुणांना आधार देणारा आहे.
पाण्याच्या बाबतीत कोपरगाव व राहाता तालुक्यावर अन्याय झालेला असून विखे पाटील यांनी रबी हंगामासाठी आवर्तने मिळण्यासाठीही लक्ष घालावे, अशी मागणी आमदार काळे यांनी केली.