Rohit Pawar News : कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील एक हायप्रोफाइल मतदारसंघ. या मतदारसंघात शरद पवार यांचे नातू, विद्यमान आमदार रोहित पवार हे महाविकास आघाडी कडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तसेच महायुतीकडून भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार प्राध्यापक राम शिंदे हे उभे आहेत. या विधानसभा मतदारसंघात प्रचारादरम्यान मोठा हाय व्होल्टेज प्रचार पाहायला मिळाला.
मतदार संघात भूमिपुत्र विरुद्ध बाहेरचा हा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजला. प्राध्यापक राम शिंदे यांनी सुरू केलेल्या भूमिपुत्र चळवळीला मतदारसंघात जबरदस्त प्रतिसाद मिळाला. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्याकडून कर्जत जामखेड मतदारसंघात पैशांचं वाटप सुरु असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
बारामती अॅग्रोच्या अधिकाऱ्यांकडून कर्जत जामखेडमध्ये पैशांचे वाटप सुरु असल्याचं भाजपनं म्हटलं आहे. महाराष्ट्र भाजपच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून रोहित पवारांवर हे आरोप करण्यात आले असल्याने सध्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात मोठी खळबळ माजली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून निवडणूक आयोगाने दखल घेऊन यावर त्वरित कारवाई करण्याचीही मागणी सुद्धा करण्यात आली आहे. तसेच, यावर खासदार सुप्रिया सुळेंनी आता मूग गिळून गप्प बसू नये असंही भाजपनं म्हटलं आहे.
त्यामुळे रोहित पवार यांच्यावर लगावण्यात आलेल्या या आरोपांवर आता भारतीय निवडणूक आयोग नेमकी काय कारवाई करणार? याकडे कर्जत जामखेड सहित संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष राहणार आहे. दरम्यान आपल्यावर लगावण्यात आलेल्या आरोपांचे रोहित पवारांकडून खंडन करण्यात आले आहे.
आमदार रोहित पवार यांनी माझ्या मतदारसंघात पैसे वाटप करतानाचं पद्धतशीरपणे नाटक रंगवण्यात आलं असून यासंदर्भात मी सविस्तर माहिती देणार असं म्हणतं आरोपांचे खंडन केले आहे. मात्र या आरोपांमुळे मतदारसंघात मोठी खळबळ माजली आहे.
भारतीय जनता पक्षाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून कर्जत- जामखेड मतदारसंघातील नान्नज येथे रोहित पवारांच्या माणसांकडून पैसे वाटप केल्याचा दावा करण्यात आला आहे. कोणी मोहिते नावाचा व्यक्ती पैसे वाटप करत असल्याचे राम शिंदे यांच्या समर्थकांकडून सांगितले गेले आहे.
संबंधित व्यक्तीला पैशासह लोकांनी ताब्यात घेतल्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही हे विशेष आहे. मात्र, पोलिसांकडून संबंधित व्यक्तीची चौकशी सुरु झाली आहे.