Rohit Pawar : सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाचा महत्वाचा विषय म्हणजे सिध्देश्वर देवसस्थान, सिद्धेश्वर साखर कारखान्यासोबतच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ व विद्यापीठातील अहिल्यादेवींच्या स्मारकाचा समावेश आहे. यामुळे याठिकाणी आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्वच पक्ष आग्रही असतात.
असे असताना गेल्या आठवड्यात स्मारक समितीमध्येही बदल झाला. यावेळी आमदार रोहित पवारांना मोठा धक्का बसला आहे. स्मारक समितीच्या माध्यमातून सोलापूरच्या राजकारणात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची असलेली पकड पुन्हा एकदा दिसून आली. या समितीत पडळकर यांच्या चळवळीतील त्यांच्या अनेक सहकाऱ्यांना संधी मिळाल्याचे दिसते.
यापूर्वी या समितीत इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीत कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा समावेश झाला होता. आमदार पवारांचा या स्मारक समितीत समावेश झाल्याने भाजप काहीशी मागे पडली होती.
यामुळे हा विषय राष्ट्रवादीसाठीही किती महत्वाचा आहे? याचा अंदाज सहजपणे येऊ शकतो. मात्र आता भाजपने आपले समर्थक या समितीत बसवले आहेत.
आताच्या स्मारक समितीच्या माध्यामतून धनगर समाजाच्या चळवळीतील तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी मिळाली आहे. स्मारकासाठी आतापर्यंत तिसरी समिती नेमण्यात आली आहे. यामुळे आता तरी हा विषय मार्गी लागणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर झालेल्या नवीन समितीमध्ये सांगोल्यातून डॉ. बाबासाहेब देशमुख यांना संधी देण्यात आली आहे. सांगोल्यातून आगामी निवडणुकीसाठी कोणते डॉक्टर? हा प्रश्न अनुत्तरीत असताना दोन्ही डॉक्टरांना स्मारक समितीच्या माध्यमातून समान संधी मिळाली आहे.